बोटांच्या ठशांवरून गुन्हेगाराची माहिती कळणार; तंत्रज्ञानाने पुणे पोलीस हायटेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:32 AM2019-02-25T00:32:29+5:302019-02-25T00:32:34+5:30
जलद गतीने तपास करणे होणार शक्य : शहरातील ३० पोलीस स्थानकांवर होणार ‘एएमबीआयएस’ यंत्रणा कार्यान्वित
पुणे : एखाद्या गुन्ह्याचा २४ तासांच्या आत तपास करून त्या गुन्ह्याच्या आरोपीपर्यंत पोहोचण्यात स्कॉटलंड पोलिसानंतर एकीकडे मुंबई पोलिसांचा क्रमांक लागतो. असे म्हटले जात असले तरी दुसरीकडे पुणे पोलीस प्रशासन यंत्रणेने गुन्हेगारांना पकडण्याकरिता जास्तीत जास्त ‘हायटेक’ होण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत शहरातील ३० पोलीस स्थानकांवर ‘एएमबीआयएस’ नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार असून, त्या माध्यमातून गुन्हेगारांचा ‘बायोडाटा’ त्या मशीनमध्ये जतन केला जाणार आहे. आतापर्यंत त्यात पुण्यातील २ लाख ५० हजार आरोपींच्या बोटांचे ठसे समाविष्ट करण्यात आले आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातील साडेसहा लाख आरोपींच्या बोटांचे ठसे सर्व्हरमध्ये ‘सेव्ह’ करण्यात आले आहेत.
या यंत्रणेमुळे पोलीस प्रशासनाला तातडीने महत्त्वाच्या गुन्हेगारापर्यंत पोहोचणे शक्य होणार असून त्यानिमित्ताने गुन्हासिद्धता व गुन्हेगारीला शिक्षा मिळण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. एमबीआयएस (आॅटोमेटेड मल्टिमोडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम) संगणकीय कार्यप्रणाली सर्व पोलीस ठाणे, पोलीस प्रशिक्षण केंद्र, अंगुली मुद्रा केंद्र (फिंगर प्रिंट सिस्टीम) परिक्षेत्रीय कार्यालय व मध्यवर्ती कारागृहात कार्यान्वित होणार आहे. एका कंपनीच्या माध्यमातून मेसा (महाराष्ट्र इनरोलमेंट सर्व्हिस अप्लिकेशन) हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.
ही संगणकीय कार्यप्रणाली सीसीटीएन प्रणालीशी संलग्न राहणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण साडेसहा लाख आरोपींच्या बोटांचे ठसे या सर्व्हरमध्ये जतन करण्यात आले आहे. त्यापैकी पुण्यातील २ लाख ५० हजार आरोपींच्या बोटांचे ठसे समाविष्ट करण्यात आले आहे. अटक होणाऱ्या प्रत्येक आरोपीची बायोमेट्रिक माहिती (उदा. दहा बोटांचे ठसे, तळहातांचे ठसे, डोळ्यांची बुबुळे, डिजिटल प्रतिमा) आदी स्कॅनरद्वारे घेऊन मुंबईतील मुख्य बीएसएनएल डाटा सेंटर येथे सर्व्हरवर जतन करण्यात येणार आहे.
आरोपींची बायोमेट्रिक माहिती मुख्य सर्व्हरच्या डाटाशी पडताळून आरोपीला यापूर्वी कोणकोणत्या गुन्ह्यामध्ये अटक/शिक्षा झाल्याबद्दलची माहिती कमी वेळेत उपलब्ध होणार आहे. गुन्ह्याचे घटनास्थळावर उपलब्ध असलेल्या ‘प्रिंट’ घेण्याकरिता या कार्यप्रणालीचे पोर्टेबल साहित्य पुरविण्यात येणार आहे.
एमबीआयएस कार्यप्रणालीकरिता लागणारी सर्व उपकरणे पुणे शहरातील ३० पोलीस स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आली असून, लवकरच ही कार्यप्रणाली कार्यान्वित होणार असून, त्यामुळे पोलीस प्रशासनाला गुन्ह्याचा तपास करण्याकरिता सुलभता येणार आहे.
मिनिटांत सर्व काही शक्य
एएमबीआयएस तंत्रज्ञानाद्वारे गुन्हेगारांच्या संदर्भात इत्थंभूत माहिती मिळण्यास व त्या माहितीचे जतन करण्यास शक्य होणार आहे.
पोलीस प्रशासनाने यंत्रणेत जतन केलेली माहिती प्रशासनाच्या उपयोगाकरिता २४ बाय ७ उपलब्ध राहणार आहे. याकरिता शहरातील पोलीस स्थानके त्या यंत्रणेशी संलग्न करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे एका मिनिटाच्या कालावधीत हजारो हातांचे ठसे मोजणे व पडताळण्याचे काम करणे यामुळे शक्य होणार आहे.
सर्वसाधारण आरोपीबरोबरच एखाद्या मृत आरोपीच्या बोटांचे ठसे घेण्याची यंत्रणा मशीनमध्ये तयार करण्यात आली आहे. या सगळ्या प्रक्रियेची माहिती अवघ्या मिनिटभरात संगणकीय पडद्यावर दिसणार आहे.