लोकांचे प्रश्न जाणून घ्या, राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:58 AM2018-04-09T00:58:48+5:302018-04-09T00:58:48+5:30
लोकांना आज अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे, मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी लोकांमध्ये जावे. त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी केले.
पुणे : लोकांना आज अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे, मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी लोकांमध्ये जावे. त्यांचे प्रश्न समजून घ्यावेत, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी केले.
पुणे शहरातील मनसेचे प्रभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, विद्यार्थी सेनेचे शाखा अध्यक्ष आदी निवडक पदाधिकाऱ्यांचा मेळावा भोसलेनगर येथील क्लब हाऊसवर पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी कुठल्या गोष्टींवर भर द्यावा, कुठल्या बाबी टाळाव्यात याबाबत त्यांनी संवाद साधला. संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे असे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी सांगितले, ‘‘सोशल मीडिया सध्या खूपच प्रभावी माध्यम बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाला सोशल मीडियामुळेच मोठे यश मिळाले. मात्र, आज हाच सोशल मीडिया मोदी यांच्या विरोधात गेला आहे. सोशल मीडियावर तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्यामुळे त्याचा मोठा प्रभाव निवडणुकांवर पडतो आहे. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सोशल मीडियावर तुम्ही काय पोस्ट टाकता, हे सगळे पाहत असतात, त्यामुळे त्या जबाबदारीने टाका’
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिने शहरातील पक्ष संघटन मजबूत करण्यावर मनसेकडून भर दिला जात आहे. २०१४ च्या निवडणुकीनंतर निर्माण झालेली भाजपाची लाट ओसरत चालली आहे, त्यामुळे निर्माण होणारी स्पेस मनसेने घ्यावी, यासाठी कार्यकर्त्यांचे मनोबळ वाढविण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्याकडून केला जात आहे.
खालपर्यंतच्या पदाधिकाºयांशी संवाद
केवळ शहर पातळीवरील मोजक्या पदाधिकाºयांपर्यंत मर्यादित न राहता प्रभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष या अगदी खालपर्यंतच्या पदाधिकाºयांशी संवाद साधण्यावर ते भर देत आहेत. यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.