बारामती लोकसभा मतदारसंघातून जानकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 11:52 PM2018-11-13T23:52:14+5:302018-11-13T23:52:41+5:30
राहुल कुल रासपात राहणार : कांचन कुल हे नाव कशातून आले हे माहीत नाही
दौंड : बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी कांचन कुल यांचे नाव कशातून आले हे मला माहिती नाही. तरीदेखील रासपाचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याकारणामुळे माझी उमेदवारी माझ्याच हातात आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढविणार, असे संकेत दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.
दरम्यान, कुठल्याही परिस्थितीत आमदार राहुल कुल राष्ट्रीय समाज पक्षात राहतील, अशी ग्वाहीदेखील जानकर यांनी दिली. सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत राजकीयदृष्ट्या गरमागरम चर्चा होऊ लागली आहे. यासंदर्भात महादेव जानकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की मी बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या फिरतोय. भाजपाकडे लोकसभेच्या सहा जागा मागितलेल्या आहेत. पैकी बारामती आणि म्हाडा लोकसभेची जागा निश्चित रासपाला मिळेल यात दुमत नाही.
बारामती लोकसभा मतदारसंघातून रासपा आणि मित्रपक्षाचा उमेदवार कोण असणार, यात दुमत नाही. परंतु मी रासपाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यानुसार निवडणुकीच्या दृष्टीने जनतेशी संपर्क सुरू आहे. पक्षवाढीस जावा, म्हणून महिन्यातील १५ दिवस पक्षबांधणीसाठी महाराष्ट्राबाहेर जावे लागते. तरीदेखील महाराष्ट्रात आणि त्यातील त्यात बारामती लोकसभा मतदारसंघात माझा संपर्क जोमाने सुरू आहे. बारामती तालुक्यातील काही गावांमध्ये माझ्या समर्थकांनी निवडणुकीच्या कामाची जोरदार तयारी केली असल्याचे जानकर यांनी सांगितले.