गुंड गज्या मारणे खंडणी प्रकरणात कोल्हापूर कनेक्शन निष्पन्न
By विवेक भुसे | Published: October 14, 2022 12:05 PM2022-10-14T12:05:54+5:302022-10-14T12:09:55+5:30
खंडणी विरोधी पथकाने त्याला मध्यप्रदेशातील इंदूर येथून ताब्यात....
पुणे : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाचे अपहरण करणार्या कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीचे कोल्हापूरमधील चंदगड कनेक्शन पुढे आले आहे. या अपहरण प्रकरणात चंदगडमधील डॉक्टर डॉनचा सहभाग निष्पन्न झाल्याने खंडणी विरोधी पथकाने त्याला मध्यप्रदेशातील इंदूर येथून ताब्यात घेतले आहे.
डॉ़. प्रकाश बांदिवडेकर (रा. चंदगड, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. तो सराईत गुन्हेगार असून गेल्या काही वर्षांपासून फरार आहे. त्याच्यावर खून, खंडणी असे १० ते १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सुडाच्या भावनेने बांदिवडेकर कुटुंबातील दोन्हीही गटातील एका पाठोपाठ ९ जणांचे खून पडले आहेत. या सूड नाट्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरुन गेला होता. अशोक गोपाळ बांदिवडेकर यांच्या खून प्रकरणात डॉ. प्रकाश बांदिवडेकर याच्यासह १० जणांची निर्दोष सुटका झाली होती. त्यानंतर या कुटुंबातील खूनसत्र काही प्रमाणात थांबले होते. तरीही त्यांचे गुन्हेगारी कृत्य सुरुच होती.
गुंड गजानन मारणे याने सांगली व पुण्यात शेअर व्यवसाय करणार्या एका व्यावसायिकाचे वसुलीसाठी अपहरण केले होते. त्याला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यात खंडणी विरोधी पथकाने चौघांना अटक केली आहे. त्यात या व्यावसायिकाचे अपहरण केल्यानंतर तपासात प्रकाश बांदिवडेकर यानेही धमकाविल्याचे निष्पन्न झाले़ त्यानंतर त्याचा शोध घेतला असता तो इंदूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने इंदूरमधून त्याला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात १४ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. प्रकाश बांदिवडेकर हा १५ आरोपी आहे.