सह्याद्री एक्स्प्रेस सह कोल्हापूर-कलबुर्गी लवकरच सुरू करू; महाव्यवस्थापकांचे आश्वासन
By नितीश गोवंडे | Published: May 5, 2023 05:16 PM2023-05-05T17:16:09+5:302023-05-05T17:16:39+5:30
कोल्हापूर-मिरज-पुणे या मार्गावरील दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या पाहणीसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी शुक्रवारी आले होते
पुणे : कोल्हापूर-मिरज-पुणे या मार्गावरील दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या पाहणीसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी शुक्रवारी आले होते. यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य किशोर भोरावत यांच्याशी बोलताना त्यांनी सह्याद्री एक्स्प्रेस सह, कोल्हापूर-कलबुर्गी रेल्वे लवकरच सुरू करू, असे आश्वासन दिले.
यावेळी पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदु राणी दुबे, पुणे विभागाचे रेल्वे सुरक्षा आयुक्त उदय सिंग पवार, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे, विभागीय वाहतूक अधिकारी डॉ. स्वप्नील नीला, स्टेशन प्रबंधक रमेश तांदळे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य किशोर भोरावत, रेल्वे प्रवासी सेनेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे यांची उपस्थिती होती.
मिरज जंक्शन येथे महाव्यवस्थापक आले असता, रेल्वे सल्लागार समिती सदस्य, रेल्वे प्रवासी सेना आणि रेल्वे प्रवासी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी सकाळच्या सत्रात कोल्हापूर कलबुर्गी एक्स्प्रेस सुरू करावी, ती रेल्वे कोल्हापूरहून सोडणे शक्य नसल्यास मिरज जंक्शन येथून सोडण्यात यावी. तसेच कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्यात यावी. कोयना एक्स्प्रेस या रेल्वेला पूर्वी प्रमाणे डबे लावण्यात यावेत. दादर पंढरपूर एक्स्प्रेस या रेल्वेचा विस्तार मिरज पर्यंत करण्याचे मंजूर झालेले असून ही गाडी ताबडतोब सुरू करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देखील महाव्यवस्थापकांना दिले. यावर लालवानी यांनी सह्याद्री एक्स्प्रेस सह, कोल्हापूर-कलबुर्गी रेल्वे लवकरच सुरू करू, असे आश्वासन त्यांना दिले.