कोल्हापुरची रेल्वे, एसटी वाहतुक बंद ; कोल्हापुर व सांगली शहरासह नदीकाठची अनेक गावे पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 07:58 PM2019-08-07T19:58:19+5:302019-08-07T20:08:00+5:30
मागील तीन दिवसांपासून कोल्हापुर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे.
पुणे : महापुरामुळे कोल्हापुरला पाण्याचा वेढा पडला असल्याने रेल्वे व रस्ते वाहतुक पुर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे कोल्हापुरला जाणाऱ्या रेल्वेगाड्या मिरजपर्यंत धावत आहेत. तसेच एसटी प्रशासनाकडूनही बस वाहतुक बंद ठेवल्याने कोल्हापुरचा संपर्क तुटला आहे. सांगली शहरालाही महापुराचा फटका बसल्याने बस वाहतुक ठप्प झाली आहे.
मागील तीन दिवसांपासून कोल्हापुर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे तेथील सर्व नद्यांना पुर आला असून कोल्हापुर व सांगली शहरासह नदीकाठची अनेक गावे पाण्याखाली गेली आहे. कोल्हापुरमधून जाणारा मुंबई-बेंगलुरू महामार्गावरही पाणी आले आहे. तसेच रेल्वेमार्गही पाण्याखाली गेल्याने कोल्हापुरचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे कोल्हापुरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या मिरजपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. मिरज येथूनच या गाड्या सोडल्या जात आहेत. मिरजपर्यंतच जाता येत असल्याने तसेच रस्ते वाहतुक बंद झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस, बिदर एक्सप्रेस, गोरखपुर, बेंगलुरू, तिरुपती, हैद्राबाद या गाड्या मिरज स्थानकापर्यंत धावत आहेत. बुधवारी मुंबई-कोल्हापुर सह्याद्री एक्सप्रेसही रद्द करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
स्वारगेट येथून कोल्हापुर व सांगलीकडे दररोज प्रत्येकी ४० बस सोडल्या जातात. त्यामध्ये जवळपास निम्म्या शिवशाही बस आहेत. पण पुरस्थितीमुळे दोन्ही शहराकडे जाणाऱ्या बस रविवारपासून बंद आहेत. बुधवारीही स्थिती न सुधारल्याने बस बंद ठेवाव्या लागल्या. कर्नाटकमधून दररोज १०० ते १२५ फेऱ्या होतात. पण पुरामुळे या बसही आल्या नाहीत. त्यामुळे प्रवासी खोळंबून राहिले आहेत. पुर ओसरेपर्यंत बस वाहतुक बंदच राहणार आहे.
--------------
सांगली, कोल्हापुरसह ग्रामीण भागातील काही मार्गांवर बस बंद आहेत. पौडमार्गे कोकणात जाणाºया बस बुधवारपासून पुन्हा सोडण्यात येत आहेत. इतर मार्गही शक्य तिथपर्यंत सोडल्या जात आहेत. मुंबईकडे जाणारे संचलन सुरळीत आहे. पण पावसामुळे बसला गर्दी कमी आहे. परिणामी दररोज आगाराला ८ ते ९ लाख रुपयांचा फटका बसत आहे.
- प्रदीपकुमार कांबळे, आगार व्यवस्थापक, स्वारगेट
बुधवारी थेट मिरज स्थानकातून सुटलेल्या गाड्या -
- कोल्हापुर ते हैद्राबाद (कोल्हापुर ते मिरज रद्द)
- कोल्हापुर ते तिरूपती हरिप्रिया एक्सप्रेस (कोल्हापुर ते मिरज रद्द)
- कोल्हापुर ते बेंगलुरू राणीचेन्नमा एक्सप्रेस (कोल्हापुर ते मिरज रद्द)
- कोल्हापुर ते गोरखपुर महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापुर ते मिरज रद्द)
- कोल्हापुर ते बिदर एक्सप्रेस (कोल्हापुर ते मिरज रद्द)
- कोल्हापुर ते मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस (मिरज ते कोल्हापुर रद्द)