शिष्यवृत्ती निकालात कोल्हापूर प्रथम क्रमांकावर; गडचिरोली सर्वांत मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 11:42 AM2023-07-14T11:42:32+5:302023-07-14T11:43:00+5:30
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याचा इयत्ता पाचवीचा निकाल २२.३१ टक्के, तर आठवीचा निकाल ...
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याचा इयत्ता पाचवीचा निकाल २२.३१ टक्के, तर आठवीचा निकाल १५.६० टक्के एवढा लागला आहे. कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर असून, इयत्ता पाचवीचा निकाल ४० टक्के लागला असून, आठवीचा निकाल २९ टक्के लागला आहे.
गडचिरोली जिल्हा सर्वांत शेवटी असून, पाचवीचा निकाल ७ टक्के, तर आठवीचा निकाल ५.१० टक्के लागला आहे. वर्धा जिल्ह्यात शिष्यवृत्तीसाठी मंजूर असलेल्या संचाएवढे विद्यार्थीसुद्धा शिष्यवृत्तीस पात्र झाले नाहीत. इतर जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. परिषदेच्या www.mscepune.in व www.mscepuppss.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे.
राज्यात राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला. राज्यातील ९ लाख ६७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८ लाख ७० हजार १६२ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख ७० हजार २६८ विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले. त्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या ३१ हजार २५१ एवढी आहे.
राज्यातील इयत्ता पाचवीच्या ५ लाख ३२ हजार ८७६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील पाच लाख १४ हजार १३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक लाख १४ हजार ७१० विद्यार्थी पात्र ठरले आहेत, तर इयत्ता आठवीसाठी नोंदणी केलेल्या ३ लाख ६७ हजार ८०२ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ५६ हजार ०३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील पाच ५५ हजार ५५८ विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले आहेत. इयत्ता पाचवीच्या १६ हजार ५३७ विद्यार्थ्यांना, तर इयत्ता आठवीच्या १४ हजार ७१४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.