पुण्यातील आंबेगावात राहत्या घरात साकारले कोल्हापूरचे 'श्री अंबाबाई मंदिर'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 03:43 PM2022-09-05T15:43:33+5:302022-09-05T15:43:45+5:30
मुख्य मंदिरात महालक्ष्मीची भव्य मूर्ती साकारली असून मंदिराचा उंच कळस पाहताना थेट कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात आल्याची अनुभूती येते
पांडुरंग मरगजे
धनकवडी : गौरी-गणपतीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि मांगल्याचा सण! या भावनेतून आंबेगाव येथील गौरव चिटणीस यांनी घरच्या गौराईसाठी कोल्हापूरच्या अंबाबाईचे मंदिर साकारले आहे. या मंदिरासाठी त्यांनी मोठी कल्पकता दाखवत राहत्या फ्लॅटचे रुपांतर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये केले आहे. अनोख्या 'गौराई-लक्ष्मीच्या' दर्शनाला भाविक गौरव चिटणीस यांच्या घरी गर्दी करत आहेत.
गौरव चिटणीस यांनी घराचा वर्हांडा, पॅसेज व हाॅलचे रुपांतर कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराचे प्रवेशद्वार, सभामंडप व मुख्य मंदिरात केले आहे. त्यासाठी त्यांनी कागद, पुठ्ठा यांसारख्या पर्यावरण पूरक वस्तू वापरताना टाकाऊ वस्तूंचा टिकाऊ स्वरुपात वापर केला. सुरवातीला मंदिराचे आकर्षक प्रवेशद्वार, सभामंडपाच्या मधोमध गणपती, डावीकडे रेणुका मातेचे ठाणे, उजव्या बाजूला गौरी तर मुख्य मंदिरात महालक्ष्मीची भव्य मूर्ती साकारली असून मंदिराचा उंच कळस पाहताना थेट कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात आल्याची अनुभूती येते.
''आपल्याला कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जसे मुखदर्शन मिळते तशीच पद्धत या देखाव्यात मी वापरली आहे. घरातील टाकाऊ वस्तूंचा पर्यावरणपूरक उपयोग केल्यास घरसुद्धा मंदिर बनते. म्हणून आपण सर्वांनी वस्तूंचा पर्यावरणपूरक वापर करत पर्यावरण संवर्धन केले तर तीच खरी गौराईची भक्ती ठरेल. - गौरव चिटणीस.''