Sasoon Hospital: कोलकाता हत्या प्रकरणाने देशात संतापाची लाट; डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ‘ससून’ ची उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 15:30 IST2024-08-21T15:30:01+5:302024-08-21T15:30:42+5:30
‘ससून’च्या कंपाउंड भिंतीची उंची वाढवणार, १०० अतिरिक्त कॅमेरे लावणार तसेच ९० ते ९५ सुरक्षा कर्मचारी वाढवणार

Sasoon Hospital: कोलकाता हत्या प्रकरणाने देशात संतापाची लाट; डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ‘ससून’ ची उपाययोजना
पुणे: काेलकाता येथील विद्यार्थिनी डाॅक्टर महिलेवर अत्याचार आणि तिची हत्या केल्याप्रकरणी संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. त्यामध्ये बीजे मेडिकल काॅलेज तथा ससून रुग्णालयातील डाॅक्टरही सहभागी झाले असून, येथील डाॅक्टरांच्या सुरक्षिततेसाठी वाढ हाेण्यासाठी आता ससून रुग्णालयाकडून पावले उचलण्यात येत आहेत. त्यासाठी ‘ससून’च्या कंपाउंड भिंतीची उंची वाढवणार आणि आणखी १०० अतिरिक्त कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
काेलकात्यामधील महिला डाॅक्टर हत्येप्रकरणी देशांमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांकडून निदर्शने करण्यात येत आहेत. राज्यातील २३ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील सर्वच निवासी डाॅक्टरांनी आठवड्यापासून संप पुकारला आहे. ताे अजूनही मागे घेतलेला नाही. म्हणजे ही घटना काेलकात्याची असली, तरी वैद्यकीय महाविद्यालयांच्या सुरक्षिततेचा मुद्दा प्रकर्षाने समाेर आला आहे. बीजे तथा ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत माेठे वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय आहे. ते २३ एकर परिसरात आहे. येथील बेडची संख्या १८०० आहे. रुग्णालयाच्या सर्व बाजूंनी एकूण सहा ते सात गेट असून, त्यापैकी काही गेट हे कायमची बंद आहेत. तर काही ठिकाणी कंपाउंड वाॅल ही कमी उंचीची आहे.
काेलकात्याच्या घटनेनंतर आता ससून रुग्णालय प्रशासनाकडूनही सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. म्हणून कमी कंपाउंड वाॅलवरून येथून अनधिकृतपणे काेणी आत प्रवेश करू नये म्हणून या भिंतीची उंची वाढवण्याचा तसेच जे गेट कायमस्वरूपी बंद आहेत तेथे भिंत घालण्याचा विचार आहे. तसेच रुग्णालयाची जुनी इमारत ते नवीन इमारतीदरम्यानचे अंतर माेठे असल्याने येथे लाइट आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. यल्लपा जाधव आणि अधिष्ठाता डाॅ. एकनाथ पवार यांनी दिली.
काय आहेत संभाव्य उपाययाेजना
- रुग्णालयाच्या आवारातील ब्लाइंड स्पाॅटची नाेंद केली
- या ठिकाणी लाइट लावणे, १०० नवीन कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव
- जे गेट्स खराब आहेत तेथे नवीन बसवणार, उपयाेगात नसलेले कायमचे बंद करणार
- हॉस्टेल काॅरिडॉरमध्ये कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव
- आता २१७ सुरक्षा कर्मचारी आहेत त्यामध्ये अजून ९० ते ९५ वाढवणार आहे