Pune: 'कोलते पाटील डेव्हलपर्स'ला 44 लाखांचा गंडा, फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 03:14 PM2021-12-22T15:14:51+5:302021-12-22T15:22:08+5:30
पुणे : पुण्यातूून फसवणूकीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध 'कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड' या बांधकाम कंपनीची त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी 44 ...
पुणे : पुण्यातूून फसवणूकीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध 'कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड' या बांधकाम कंपनीची त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन जणांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे. अमोल गेंदलाल साखळे, कुलदीप भिलारे, चेतन पाटील, महेश बालकिशन राठी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राठी आणि पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी हर्षल रमेश नावगेकर (वय 42, रा धायरी) यांनी फिर्याद दिली आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षल नावगेकर हे कोलते-पाटील डेव्हलपर्समध्ये सिनियर मॅनेजर म्हणून नोकरी करतात. त्यांच्या कंपनीमध्ये यापूर्वी राठी, साखळे, भिलारे आणि पाटील हे काम करीत होते.
कोलते पाटील डेव्हलपर्सच्या ग्राहक असलेल्या काही वेंडर कंपन्यांसोबत असलेल्या आर्थिक व्यवहारांचा आरोपींनी दुरुपयोग केला. या आरोपींनी 15 जून 2018 ते 2 सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये कंपनीच्या रेकॉर्डवर नसलेल्या बनावट व्हेंडर कंपन्यांच्या नावाने पेमेंट केले. त्यातील पैसे स्वतःच्या फायद्याकरता वापरले. तसेच कंपनीची अधिकृत व्हेंडर कंपनी असलेल्या 'स्टील पॉईंट'च्या नावाने खोटे व बनावट कागदपत्र तयार बँकेत अकाऊंट काढले.
नंतर कंपनीमधील कॅन्सल केलेला चेक त्या खात्यावर डिपॉझिट केला. त्यामधून पैसे काढून घेऊन एकूण 44 लाख 1 हजार 637 रुपयांची फसवणूक केली आहे. कंपनीकडून याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज देण्यात आला होता. गुन्हे शाखेने तपास करून दोन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे करीत आहेत.