दुष्काळामुळे कोंढापुरीचा तलाव पडला कोरडाठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:07 PM2019-04-01T23:07:24+5:302019-04-01T23:07:41+5:30
पंधरा दिवसांपासून पाणीटंचाई : धरण उशाला आणि कोरड घशाला
रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरूर) येथे गेल्या पंधरा दिवसांपासून तलावामध्ये पाणीसाठाच शिल्लक नसल्याने अनेक वर्षांपासून न जाणवलेल्या भीषण दुष्काळाचे चटके कोंढापुरी गाव व इतर पंचक्रोशीमध्ये जाणवू लागले आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’
अशी स्थिती कोंढापुरी ग्रामस्थांवर आली आहे.
तरी त्वरित कोंढापुरी तलावात पाणी सोडण्याची मागणी भास्कर गायकवाड, शांताराम गायकवाड; तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राहुल दिघे, संतोष गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे शेतकरी यांचे अतोनात हाल होत असून, तसेच पिण्यासाठी कोंढापुरी तलावावर अवलंबून असलेली पाणीपुरवठा योजना कोंढापुरी, रांजणगाव गणपती, निमगाव म्हाळुंगी, खंडाळे, गणेगाव, शिक्रापूर या गावांच्या योजना असल्यामुळे पिण्यासाठी पाणी सोडणे आवश्यक आहे. मागील आवर्तनामध्ये कोंढापुरी तलावांमध्ये कमी प्रमाणात पाणी सोडलेले होते, तरी त्यामुळे पाणीसाठा काही दिवस शिल्लक राहिल्याने शेतमाल जळत असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या कोंढापुरी, गणेगाव, खंडाळे व आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये झालेली आहे, तरी तलावामध्ये पाणी सोडणे महत्त्वाचे असून लवकरात लवकर पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
सलग दोन वर्षे झालेल्या पावसाचे कमी प्रमाण त्यामुळे पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. एकंदरीत दुष्काळी परिस्थिती आणि गेल्या दोन वर्षांमध्ये शेतमालाला असलेला नीचांकी बाजारभाव यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.
कोंढापुरीमध्ये काही दिवसांपासून दिवसाआड पाणी सोडण्याचे काम चालू झालेले आहे, काही दिवसांतच टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करावी लागणार असे दिसत आहे.