कोंढवा बुद्रुक काकडेगल्ली : सिलिंडरच्या स्फोटात तीन घरे खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 02:57 AM2019-02-04T02:57:36+5:302019-02-04T02:57:51+5:30
कोंढवा बुद्रुक येथे घरात असलेल्या सिलिंडरच्या स्फोटात तीन घरे पूर्णपणे जळून खाक झाली असून, यात राहणाऱ्या लोकांच्या संसाराचा पूर्णपणे कोळसा झाला आहे.
कोंढवा - कोंढवा बुद्रुक येथे घरात असलेल्या सिलिंडरच्या स्फोटात तीन घरे पूर्णपणे जळून खाक झाली असून, यात राहणाऱ्या लोकांच्या संसाराचा पूर्णपणे कोळसा झाला आहे. या लोकांना राहायला छत राहिले नाही की रोजच्या संसारोपयोगी वस्तू जळल्या असल्याने जगण्यासाठी पुन्हा नव्याने जुळवाजुळव करावी लागणार आहे.
कोंढवा बुद्रुक येथील काकडे वस्तीमधील गल्ली नंबर ३ येथे शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास वाघमारे यांच्या घराच्या दुसºया मजल्यावर असलेल्या पत्राच्या खोल्यांमध्ये ही घटना घडली. २.३० च्या सुमारास अचानक सिलिंडरचा स्फोट झाल्याचा आवाज आजूबाजूला राहणाºया लोकांना ऐकू आला. वाघमारे यांच्या घराच्या दुसºया मजल्यावर तीनपत्र्याच्या खोल्या असून यात भाडेकरू राहत होते.
घरातील वस्तू सर्वत्र फेकल्या गेल्या. या वेळी या घरात कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. कोंढवा बुद्रुक व खुर्द या अग्निशमन दलाच्या, तसेच मुख्य अग्निशमन दलाच्या एका गाडीने या आगीवर त्वरित नियंत्रण मिळविले. गल्लीत असलेले अरुंद रस्ते व रस्त्याच्या सुरू असलेल्या कामांमुळे घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागली. एका खोलीत राहत असलेल्या ललिता परमेश्वर बनसोडे यांच्या घरातील बंद कपाटात असलेले सोन्याचे दागिने सहीसलामत मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. तांडेल सुभाष जाधव, अजय बेलोसे, संग्राम देशमुख, ताठे, रवी बारटक्के, राजाराम केदारी, मंगेश मिळवणे, शफीक सय्यद, आकाश पवार, विशाल यादव या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग विझवली.
कोणत्या तरी एका खोलीत सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट कोणत्या कारणास्तव झाला याचे कारण कळू शकले नाही.
या खोलीचे पत्रे स्फोटामुळे उंच उडाले व घरातील साहित्याला आग लागली.
बघता बघता आग शेजारी असलेल्या इतर खोल्यांमध्ये पसरली व या खोल्यांमध्ये असलेले दोन सिलिंडर एका मागोमाग फुटले. ज्यामुळे या तिन्ही खोल्यांमध्ये असलेले संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.