पुणे-नाशिक मार्गाची कोंडी सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:32 AM2018-10-04T00:32:03+5:302018-10-04T00:32:19+5:30
तुटपुंज्या उपायजोजना : प्रवाशांची होतेय गैरसोय; कायमस्वरूपी नियोजनाची मागणी
आंबेठाण : पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अनेक पर्याय निवडले जात आहेत. मात्र मुख्य मार्गावरील दुतर्फा बेकायदेशीरपणे पार्किंग केलेली वाहने तसेच सर्व्हिस रस्त्यावर अनेक ठिकाणी साचणारे पावसाचे पाणी यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे.
चाकणमध्ये वाढत्या औद्योगिकरणाबरोबर वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र, वाढत्या वाहतूकीचा भार उचलण्यासाठी तुलनेने रस्ते कमी पडू लागले. त्यात रस्त्यालगतची अतिक्रमणे, चाकण ते भोसरी दरम्यानची अवैध वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, सीएनजी किटवरील तीन चाकी रिक्षा सुरू झाल्या आहेत. यावर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. गेल्या महिन्यापासून वाहतूककोंडीत भर पडली आहे. यामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावर चिंबळी फाटा, मोई फाटा, कुरुळी फाटा, एमआयडीसी फाटा, आळंदी फाटा, तळेगाव चौक, आंबेठाण चौक; तसेच चांडोली टोल नाका ते राजगुरुनगर बाजार समिती कार्यालयापर्यंत वाहनांच्या कायम रांगा लागलेल्या असतात. आयआरबी ही रस्ते कंपनी दोन ठिकाणी या रस्त्यावर टोल आकारते; पण रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने पार्किंग केली जात आहे. तसेच सर्व्हिस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठत आहे. तसेच अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत याकडे दुर्लक्ष करत आहे. नव्याने चाकण शहरात दाखल झालेल्या वाहतूक पोलिसांकडून यावर आळा घालुन वाहतूककोंडी सोडविण्यासाठी योग्य प्रकारे पावले उचलली जावीत, अशी मागणी प्रवाशी नागरिक करत आहेत. पोलिसांनी नुसतेच वाहनांचे फोटो काढून दंड वसूल करण्यात धन्यता मानू नये.
बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्याची मागणी
वाहतूककोंडीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण विरुद्ध बाजूने ये-जा करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. रहदारीस अडथळा ठरणाºया वाहनांवर कारवाई केली पाहिजे.
अवैध वाहतुकीचा अडथळा चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर, चाकण-आंबेठाण तसेच चाकण ते भोसरी या मार्गावर कमी जास्त प्रमाणात अवैध वाहतूक चालते. ही वाहने महामार्गावर चौकात अस्ताव्यस्त लावलेली असतात. पोलिसांकडून या वाहनांवर कारवाई होत नसल्याने त्यांचे फावते आहे.