कोकण गोव्यात काही ठिकाणी अतिवृष्टी
By admin | Published: June 30, 2017 03:59 AM2017-06-30T03:59:31+5:302017-06-30T03:59:31+5:30
राज्यात पावसाने चांगलाच जोर पकडला असून, कोकण गोव्यातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार आणि मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात पावसाने चांगलाच जोर पकडला असून, कोकण गोव्यातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार आणि मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. पुढील दोन दिवसांत कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
नैर्ॠत्य मान्सूनने राज्यात सर्वदूर हजेरी लावली असून, सर्वच भागांमध्ये चांगला पाऊस सुरू आहे. काहीशा समाधानकारक पावसामुळे बळीराजाही सुखावला आहे. गेल्या चोवीस तासांत कोकण गोव्यातील पेण ४०, कर्जत २४, अलिबाग २०, मुरूड १७, कणकवली, पनवेल सावंतवाडी १२, चिपळूण ११ देवगड ९, दापोली, रत्नागिरी ८ मिमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातही महाबळेश्वर, नाशिक, कोल्हापूर, सातारा आदी भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दरम्यान पुण्यातही सकाळपासूनच अधूनमधून हलक्या ते जोरदार सरी पडत होत्या. मध्येच विश्रांती घेत सरींचा खेळ सुरू होता. पावसामुळे पुणेकरांना सूर्याचे दर्शन झालेले नाही. तीन ते चार
दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.