कोरेगाव भीमा दंगल प्रकरण : गुन्हे मागे घेण्याची घोषणा हवेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 06:35 AM2018-05-30T06:35:22+5:302018-05-30T06:35:22+5:30
कोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये राज्यभरात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील
पुणे : कोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये राज्यभरात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, याबाबतचा कोणताही अध्यादेश मुख्यमंत्री अथवा गृह विभागाने अद्यापही काढलेला नाही. आम आदमी पक्षाच्या वतीने माहिती अधिकारात याबाबत माहिती विचारण्यात आली होती. त्यातूनच ही गंभीर बाब उघड झाली.
मुख्यमंत्र्यांच्या या फसव्या घोषणेचा निषेध आम आदमी पार्टी व समविचारी संघटनांनी पुणे स्टेशन येथे नोंदविला. मुख्यमंत्र्यांनी याबाबतची तत्काळ योग्य कारवाई करावी. दिलेला शब्द पाळून कार्यकर्त्यांची या गुन्ह्यांतून मुक्तता करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून देण्यात आला.
कोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर ३ जानेवारी रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पाळण्यात आला होता. या बंदमध्ये अनेक सर्वसामान्य नागरिक व तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. या युवकांना भविष्यात रोजगार व नोकरीवाचून वंचित राहावे लागणार आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे गुन्हे मागे घेण्यात येतील, असे सांगितले होते. मात्र पाच महिने उलटूनदेखील याबाबत कोणताही अध्यादेश मुख्यमंत्री अथवा गृह विभागाने काढलेला नाही.
आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते गणेश ढमाले यांनी माहिती अधिकारात ही बाब उघड केली.