कोरेगाव भीमा परिसर : १५० जणांवर प्रतिबंधक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 12:53 AM2018-12-27T00:53:09+5:302018-12-27T00:53:32+5:30
दरवर्षी एक जानेवारी रोजी पेरणे फाटा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून ७ ते ८ लाख समाजबांधव येत असतात.
कोरेगाव भीमा : दरवर्षी एक जानेवारी रोजी पेरणे फाटा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून ७ ते ८ लाख समाजबांधव येत असतात. या काळात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील १८ जणांना तडीपार करण्यात आले. एकूण १५० जणांवर कारवाई करण्यात येणार असतानाच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनुजही बऱ्याच लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.
सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच १ जानेवारी रोजी पेरणे फाटा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाºया सात ते आठ लाख समाजबांधवाच्या सुरक्षेची त्याचबरोबर नियोजनाची जबाबदारी पुणे ग्रामीण पोलीस दलावर असते. परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्याकामी स्थानिक नागरिक, पोलीस मित्र, ग्रामपंचायत, अनेक उद्योजक रहदारी नियोजन करण्यासाठी मदत करत असतात. परिसरात सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरविणे, जातीय भावना दुखावणे अशांवर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले. परिसरात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू राहणार आहेत. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे एक जानेवारीच्या पार्श्वभूमीवर दररोज परिसराची समक्ष भेट देऊन माहिती घेत आहेत. नागरिकांनी व मानवंदना देण्यासाठी येणाºया समाजबांधवांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. तत्काळ ९८६०२७२१२३ व ०२१३७२८६३३३ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी
केले आहे.
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कलम १०७ नुसार १२२ जण. कलम ११० नुसार १०, तरकलम ५६ नुसार १८ जण तडीपार अशा एकूण दीडशे जणांवर प्रतिबंधक कार्यवाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तर इतरही बहुतांश लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.