Koregaon Bhima | विजयस्तंभ परिसरात कडेकोट बंदोबस्त SRPF च्या ७ तुकड्या तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 01:37 PM2022-12-31T13:37:43+5:302022-12-31T13:42:35+5:30
अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी वाहन पार्किंगस्थळे निश्चित...
पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून नियमित पोलिसांव्यतिरिक्त राज्य राखीव पोलिस दलाच्या सात तुकड्या बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या आहेत. दि. १ जानेवारीला देशभरातून मोठ्या संख्येने येथे अनुयायी अभिवादनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी या परिसराला भेट देऊन नियोजनाचा आढावा घेतला. तसेच अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी वाहन पार्किंगस्थळे निश्चित करण्यात आली आहेत.
यावेळी पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार किरण सुरवसे उपस्थित होते. देशमुख म्हणाले, ‘अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर, शौचालय, वाहनतळ, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तसेच आरोग्य विभागाच्या वतीने औषधे, मास्क आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच विजयस्तंभ फुलांनी सजविण्यात येत आहे. चारही बाजूंनी बॅरिकेड तसेच महिलांसाठी हिरकणी कक्ष आणि स्वतंत्र तात्पुरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरात नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.’
कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभास अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी वाहन पार्किंगस्थळे निश्चित करण्यात आली आहेत. तर पार्किंगच्या ठिकाणापासून विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी पीएमपीएमएल बसेसची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणीच अनुयायांनी आपली वाहने पार्क करण्याचे आवाहन पुणे शहराचे वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
पुण्याकडून येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंग :
कार पार्किंग-आपले घर शेजारी हनुमंत कंद यांचा प्लॉट तसेच संदीप सातव यांचा प्लॉट लोणीकंद, लोणीकंद बौद्धवस्ती शेजारी सागर गायकवाड यांचा प्लॉट, तुळापूर फाटा स्टफ कंपनी शेजारी मोकळा प्लॉट, सामवंशी अकॅडमी समोर थेऊर रोड, खंडाेबाचा माळ.
खासगी बस पार्किंग - आपले घर सोसायटीच्या मागील प्लॉट.
१ जानेवारी रोजी पुणे आणि थेऊरकडून येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांची वर्दळ जास्त असल्याने लोणीकंद चौकात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून लोणीकंदकडून खंडोबा माळ आणि सामेश्वर पार्किंगकडे जाणारा मार्ग पीएमपी बस वगळता इतर वाहनांसाठी एकेरी राहील.
आळंदीकडून येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंग :
कार पार्किंग- तुळापूर रोड वाय पॉइंट समोरील पार्किंग, फुलगाव सैनिकी शाळा मैदान
थेऊर, सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंगची ठिकाणे :
कार पार्किंग-खंडोबाचा माळ
अष्टापूर डोंगरगावकडून येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंग :
कार पार्किंग- पेरणे गाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील मोकळे मैदान
दुचाकींसाठी पार्किंगची ठिकाणे :
तुळापूर फाटा संगमेश्वर हॉटेलच्या मागे मेन चौक, टाटा मोटर्स शोरूमचे मोकळे मैदान, टाटा मोटर्स शोरूमशेजारील मोकळे मैदान, पेरणे पोलिस चौकीमागील मोकळे मैदान, ज्योतिबा पार्क गो शाळेच्या शेजारील प्लॉट.
पुणे शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पुणे शहराचे पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालय हद्दीत शनिवारी (ता. ३१) मध्यरात्री पासून सोमवारी (ता. २ जानेवारी) मध्यरात्रीपर्यंत कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यानुसार कोणतीही व्यक्ती इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे खोटे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाही किंवा फॉरवर्ड करणार नाही याची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती आणि ग्रुप ॲडमिनची असेल. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद केले आहे.