कोरेगाव-भीमा दंगल म्हणजे एल्गार परिषदेचा दुष्परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 07:24 AM2018-11-16T07:24:29+5:302018-11-16T07:25:06+5:30
दोषारोपपत्रात पोलिसांचा निष्कर्ष : भाषणांमुळे हिसांचाराची व्याप्ती वाढली
पुणे : भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ब्राह्मण केंद्रीत अजेंड्याच्या विरोधात दलित समाज गेला आहे. त्यांच्यातील असंतोषाचे भांडवल करून त्याद्वारे गोंधळ घडवून आणण्याचे सीपीआय या माओवादी संघटनेचे काम एल्गार परिषदेच्या माध्यमातून अटकेतील आरोपींनी केले आहे. कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचा दुष्णपरिणाम असून, सीपीआयची (एम) पूर्वतयारी आणि एल्गार परिषदेत झालेल्या भडकाऊ भाषणांमुळे कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचे स्पष्ट होत आहे, असे पोलिसांनी
दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराच्या अनुषंंगाने दाखल झालेल्या गुन्ह्यातील पाच आरोपींच्या विरोधात गुरुवारी पुणे पोलिसांनी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. अटक करण्यात आलेले सुधीर ढवळे, रोना विल्सन, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, अॅड. सुरेंद्र गडलिंग आणि भूमिगत असलेले कॉ. एम ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे, किशनदा ऊर्फ प्रशांत बोस, प्रकाश ऊर्फ नवीन ऊर्फ रितुपण गोस्वामी, कॉ. दिपू आणि कॉ. मंगलू अशा दहा जणांविरोधात ५ हजार १६० पानी दोषारोपत्र न्याायालयात दाखल केले. त्यात ८० साक्षीदारांचे जबाब नोंदविल्याची माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.
आरोपींवर पोलिसांनी भादंवि कलम १५३ (अ), ५०५ (१) (ब), १२० (१), १२१, १२१ (अ), १२४ (अ), ३४, बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा १९६७ सुधारित अधिनियम २०१२ कलम १३, १६, १७, १८, १८ (ब), २०, ३८, ३९, ४० ही कलमे लावली आहेत. या प्रकरणातील पाच आरोपींना सहा जूनला अटक केली होती.
आरोपींची गुन्ह्यातील भूमिका
मिलिंद तेलतुंबडे : छत्तीसगडमध्ये शरण आलेला गडचिरोलीतील वरिष्ठ माओवादी नेता पहाडसिंग याचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. त्यात त्याने भूमिगत नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडे हा शहरी माओवादाचे नेटवर्क सांभाळत आहे. तसेच दलित संघटनांना चळवळीत सहभागी होण्याकरिता प्रेरित करतो, असे सांगितले आहे.
रोना विल्सन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्यासंर्दभात पुरावे मिळून आले. किशनदा ऊर्फ प्रशांत बोस याच्यासोबत रोना विल्सन याचे ईमेलद्वारे झालेले संभाषण पोलिसांना मिळाले. दारुगोळा आणि शस्त्रसाठा पुरवण्यात मुख्य भूमिका.
अॅड. सुरेंद्र गडलिंग : नक्षलवादी कारवायांसाठी निधीची तरतूद, भूमिगत नेत्यांसोबत संपर्क करून शहरी नक्षलवादी कारवायांची अंमलबजावणी.
प्रा. शोमा सेन : संदेशांची देवाणघेवाण, बैठकींचे आयोजन यात महत्त्वाची भूमिका, अनुराधा गंडी मेमोरियल ट्रस्ट मार्फत गुप्तपणे बेकायदेशीर कारवाया.
महेश राऊत : नवीन तरुणांची भरती करणे, आर्थिक निधीची उभारणी, पैशांची देवाण-घेवाण, सदस्यांचे दुर्गम भागात प्रशिक्षण.
सुधीर ढवळे : एल्गार परिषदेच्या आयोजनात प्रमुख भूमिका, निधीची उपलब्धता, माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य.