Koregaon Bhima : राज्यातील ७० जणांना विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी ‘नाे एंट्री’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 05:57 PM2022-12-31T17:57:09+5:302022-12-31T17:57:59+5:30
आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या चौघांना नोटीस...
पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन कार्यक्रमासाठी १ जानेवारी राेजी हजाराे नागरिक येतात. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुण्यासह राज्यातील ७० जणांना या कार्यक्रमाला येण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या चौघांना नोटीस पाठविण्यात आली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ही माहिती दिली.
कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पुणे ग्रामीण, पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. याबाबत ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तयारीची माहितीही फुलारी यांनी दिली. यावेळी पोलिस अधीक्षक अंकित गोयल उपस्थित होते.
फुलारी म्हणाले की, कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी तसेच तपासणी करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली. पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या समन्वयातून बंदोबस्ताची आखणी केली आहे. परिसरातील गावांमध्ये शांतता कमिटीची बैठक घेण्यात आल्या. यापूर्वी या परिसरात झालेल्या गुन्ह्यांमधील संशयित आरोपींकडून कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी ७० जणांना १४४ कलमानुसार बंदी घातली आहे. तशा नोटिसा दिल्या आहेत. ते या परिसरात आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
सोशल मीडियावर २४ तास नजर
शौर्यदिनानिमित्त कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट कोणी पाठविल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सुनील फुलारी यांनी सांगितले. त्यासाठी सायबर पोलिसांच्या वतीने २४ तास सोशल मीडियावर नजर ठेवण्यात आली आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या चौघांना नोटिसा दिल्या असून त्या पोस्ट काढून टाकण्यास सांगितले आहे. अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांनी वाहनांसाठी आखण्यात आलेल्या नियोजनाचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही फुलारी यांनी केले.
ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त
७ पोलिस अधीक्षक,
१८ विभागीय पोलिस अधिकारी,
६० पोलिस निरीक्षक,
१८० सहायक निरीक्षक,
राज्य राखीव पोलिस दलाच्या ४ कंपन्या,
१ हजार होमगार्ड.