कोरेगाव भीमा : रश्मी शुक्लांचं 74 पानी प्रतिज्ञापत्र, जयस्तंभ अन् समाधीस्थळाला भेट देणार आयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 03:03 PM2022-02-05T15:03:40+5:302022-02-05T15:09:01+5:30
कोरेगाव भीमा प्रकरण : कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर उलटतपासणी सुरू
पुणे : एल्गार परिषदेच्या अनुषंगाने गुप्तचर विभागाकडून पुणे पोलिसांना मिळालेले वेगवेगळे पत्र, सोशल मीडियात प्रसारित होणारे आक्षेपार्ह मेसेजची पत्रे, बामसेफने चिथवाणीबाबत दिलेले पत्र, पुणे पोलीस व पुणे महापालिकेने दिलेल्या सर्शत परवानगीचे पत्र, बंदोबस्त माहिती, फिर्यादी तुषार दामगुडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार व एनआयकडे वर्ग झालेल्या तपासाची पत्रे व पिंपरी पोलीस ठाण्यात अनिता सावळे यांनी दाखल केलेली तक्रार व पुणे ग्रामीण पोलिसांकडे वर्ग केलेला तपासाची सर्व पत्रे तसेच ७४ पानी प्रतिज्ञापत्र रश्मी शुक्ला यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर शुक्रवारी सादर केले आहे.
एका साक्षीदाराचे वकील ॲड. बी. जी. बनसोडे यांनी शुक्ला यांची शुक्रवारी उलटतपासणी घेतली. शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी आयोजित केलेल्या एल्गार परिषद आणि दुसऱ्या दिवशी घडलेली हिंसाचाराची घटनेबाबत साक्ष आयोगासमोर नोंदविली आहे. एल्गार परिषदेनंतर कोणताही अनूचित प्रकार किंवा हिंसाचार घडला नाही. अक्षय बिक्कड याने सुरुवातीला डेक्कन पोलीस ठाण्यात जिग्नेश मेवानी व उमर खलिद यांच्या विरोधात तक्रार दिली होती. ती विश्रामबाग पोलीस ठाण्यात वर्ग केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याशी कोणताही संर्पक केला नाही. एल्गार परिषद आयोजकांकडून शनिवारवाडा ते कोरेगाव भीमा दरम्यान प्रेरणा मार्च काढणार होता. परंतु, त्यास परवानगी नाकारल्याचे रश्मी शुक्ला यांनी आयोगासमोर सांगितले.
चौकशी आयोग कोरेगाव भीमा, वढूला देणार भेट
आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल व सदस्य सुमित मल्लिक यांच्या समोर सध्या पुण्यातील जुन्या जिल्हा परिषद इमारतीत सुरु आहे. माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची साक्ष शुक्रवारी नोंदविली. आयोग उद्या (शनिवारी) सकाळी अकरा वाजता कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ व वढू येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळास भेट देणार आहे.
विश्वास नांगरे-पाटील यांना साक्षीसाठी बोलवा
कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालिन पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी हिंसाचाराची घटना घडल्यानंतर घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. तसेच आढावा घेतला होता. आयोगाचे वकील ॲड. अशिष सातपुते यांनी आयाेगला लेखी पत्र देत नांगरे-पाटील यांना चाैकशीसाठी बाेलविण्याची मागणी केली आहे.