कोरेगाव खुर्द येथे मुलास पेटविले!
By admin | Published: January 5, 2015 12:33 AM2015-01-05T00:33:37+5:302015-01-05T00:33:37+5:30
कोरेगाव खुर्द (खेड) येथे १३ वर्षाच्या मुलास रात्रीच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी अंगावर रॉकेल टाकून पेटविले.
चाकण : कोरेगाव खुर्द (खेड) येथे १३ वर्षाच्या मुलास रात्रीच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी अंगावर रॉकेल टाकून पेटविले. सदर मुलगा ९८ टक्के भाजल्याने ससून येथे उपचार चालू असताना मयत झाल्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज ( ता. ४ ) रात्री दोन वाजता कोरेगाव खुर्द येथे घरापासून १०० मीटर अंतरावरील डोंगराजवळ घडली. आकाश संदीप महाळुंगकर असे मयत झालेल्या मुलाचे नाव असून, तो सातवी इयत्तेत शिकत होता.
आकाशने दिलेल्या फिर्यादी जबाबावरून तो आज रात्री दोन वाजता घरातून डोंगराजवळ शौचाला गेला होता. त्या वेळी २५ ते ३० वयाच्या
दोन अज्ञात व्यक्तींनी तुला जाळून टाकतो, असे म्हणून त्याच्या अंगावर रॉकेल टाकून पेटविल्याचे सांगितले. त्यानंतर आकाश आरडाओरडा करीत घरी पळत गेला. त्यात तो ९८ टक्के भाजला.
चाकणच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यास ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. हवेली पोलिसांनी आकाशचा जबाब घेऊन गुन्हा
दाखल करून चाकण पोलिसांना कळविले.
चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आज सायंकाळी ६ वाजता आकाश मयत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हा काहीतरी घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत असून, घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर अधिक माहिती उजेडात येईल, असे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)