Kasba Election | कसब्यातील निकालाची कोथरुड भाजपला भीती?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 03:56 PM2023-03-04T15:56:11+5:302023-03-04T15:58:48+5:30

२०१९च्या निकालाचा अर्थही कारणीभूत...

Kothrud BJP is afraid of the result in the kasba by election pune latest news | Kasba Election | कसब्यातील निकालाची कोथरुड भाजपला भीती?

Kasba Election | कसब्यातील निकालाची कोथरुड भाजपला भीती?

googlenewsNext

- राजू इनामदार

पुणे : कसब्यातील पराभव भारतीय जनता पक्षाच्या चांगलाच वर्मी लागला असून सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या तरी तीच चर्चा सुरू आहे. संपूर्ण पुणे शहर भाजपला दिशा देणाऱ्या कसब्यातच पराभव झाल्याने आता इतर विधानसभा मतदारसंघांमध्येही भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यातही पालकमंत्री चंद्रकात पाटील प्रतिनिधित्व करत असलेल्या कोथरुडमध्ये तर सध्या कसब्याचीच चर्चा सुरू आहे.

कसबा व कोथरुड यांच्यात आंतरिक संबंध आहेत. कसब्यातील बहुसंख्य उच्चभ्रू जुना वाडा सोडून कोथरुडला सोसायट्यांमधील सदनिकांमध्ये राहायला गेले आहेत. मागील काही वर्षांत कसब्याचा हा ब्रेन ड्रेन भलताच वाढला आहे. हा सगळा भाजपचा पारंपरिक मतदार. कसब्यात असला काय किंवा कोथरुडला, तो भाजपलाच मतदान करणार असे समजले जाते. याला थोडाफार अपवाद असेल, पण या समजात तथ्यच जास्त आहे. त्यामुळेच हक्काचा मतदारसंघच नसलेल्या चंद्रकात पाटील यांना भाजपने कोल्हापुरातून थेट कोथरुडला आणले व उमेदवारी दिली. निवडून येण्याची खात्री असल्यानेच हा बदल पक्षाच्या तेथील आमदार असलेल्या मेधा कुलकर्णी यांना थांबविण्यात आले. कसब्यातील निकालात तोही राग व्यक्त झाला असल्याचे बोलले जात आहे.

ट्रेंड कायम राहिल्यास

कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या स्थापनेपासून म्हणजे १९८० पासून भाजपकडेच आहे. त्याही आधी तो जनसंघाकडे होता, मात्र १९८५ व नंतर १९९१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत तिथे काँग्रेसला विजय मिळाला होता. हे दोन अपवाद वगळता सातत्याने इथल्या मतदारांनी भाजपलाच पसंती दिली आहे. असे असताना यावेळी मात्र, मतदारांनी भाजपला हात दाखवला आहे. हा फरक थोडाथोडका नव्हे तर तब्बल १० हजारांपेक्षा जास्त मतांचा होता. त्यामुळेच कोथरुडमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना धडकी भरली आहे. हाच ट्रेंड कायम राहिला तर कोथरुडमध्येही तसेच होऊ शकते अशी कुजबुज सध्या पक्षात सुरू आहे.

२०१९च्या निकालाचा अर्थही कारणीभूत

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे उभे होते. त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांनी त्यांचा उमेदवार न देता शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. नगरसेवक असलेल्या शिंदे यांना त्यावेळी तब्बल ८० हजार मते मिळाली होती. ते इतक्या मतांचे नाहीत, त्यांना इतकी मते मिळाली याचा अर्थ कोथरुडकरांना पाटील यांची उमेदवारी पटलेली नव्हती असाच आजही काढण्यात येतो. त्यावेळी बाहेरचा माणूस लादला, अशा शब्दांत विरोधकांनी प्रचार केला होता. कसब्यातील निकालाने हा ‘बाहेरचा माणूस’ असा प्रचार जोर धरेल, असे सांगण्यात येत आहे.

असे होण्याची तीळमात्र शक्यता नाही. चंद्रकांत पाटील यांनी मागील ३ वर्षांत या मतदारसंघात कधीही झाले नव्हते, असे काम केले आहे. त्यांनी कोरोना काळात ४० हजार जणांना मदत केली. फिरता दवाखाना, फिरते ग्रंथालय यासारखे उपक्रम सुरू आहेत. मतदारसंघातील एकाही मुलीचे शिक्षण पैसे नाहीत, म्हणून थांबणार नाही असा संकल्प पाटील यांनी केला आहे. त्यामुळे कसब्यातील निकालाचा कोथरुडमध्ये काहीही परिणाम होणार नाही.

- पुनीत जोशी, अध्यक्ष, भाजप, कोथरुड विधानसभा मतदारसंघ

Web Title: Kothrud BJP is afraid of the result in the kasba by election pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.