कोथरूडची शिवसृष्टी प्रतीक्षेतच

By admin | Published: September 27, 2016 04:38 AM2016-09-27T04:38:33+5:302016-09-27T04:38:33+5:30

कोथरूड येथील महापालिकेच्या १८ एकर जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव मुख्य सभेने मान्य केला, त्याचा आराखडाही तयार झाला, मात्र तरीही प्रत्यक्षात त्याचे काम सुरू होऊ

Kothrud's Shivsirtha is waiting | कोथरूडची शिवसृष्टी प्रतीक्षेतच

कोथरूडची शिवसृष्टी प्रतीक्षेतच

Next

पुणे : कोथरूड येथील महापालिकेच्या १८ एकर जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव मुख्य सभेने मान्य केला, त्याचा आराखडाही तयार झाला, मात्र तरीही प्रत्यक्षात त्याचे काम सुरू होऊ शकलेले नाही. या जागेवर नंतर मेट्रोचे स्टेशन प्रस्तावित करण्यात आल्याने शेजारी असलेल्या बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित असून त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. शिवसृष्टीसाठी अंदाजपत्रकामध्ये ठेवण्यात आलेला ५ कोटींचा निधी इतर विकासकामांसाठी वर्ग करण्यास मुख्य सभेमध्ये विरोध झाल्याने तो प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला.
छत्रपती शिवाजीमहाराज यांचा इतिहास उलगडून दाखविणारे भव्य स्मारक कोथरूडमध्ये व्हावे, यासाठी २०१० मध्ये नगरसेवक दीपक मानकर यांनी महापालिका प्रशासनाकडे प्रस्ताव दिला. स्थायी समिती, मुख्य सभेने या विषयाला बहुमताने मंजुरी दिली. २०१० नंतरच्या प्रत्येक अंदाजपत्रकामध्ये शिवसृष्टी साकार करण्यासाठी निधीची तरतूद केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. तांत्रिक घोळामध्ये शिवसृष्टीचा प्रस्ताव रखडून ठेवण्यात आला आहे.
कोथरूडमध्ये कचरा डेपो उरुळी देवाची व फुरसुंगी येथे स्थलांतरित करण्यात आला. या कचरा डेपोची २९ एकर जागा मोकळी झाली आहे. या जागेमध्ये जागतिक दर्जाची शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय झाला. शिवाजी महाराजांचा जन्मापासूनचा इतिहास येथे शिल्परूपाने उलगडून दाखविण्यात येणार आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी याचा आराखडाही तयार केला आहे. दरम्यान, कोथरूडमध्ये मेट्रोसाठी जागा हवी असल्याने शिवसृष्टीच्या जागेवर मेट्रो स्टेशनचे आरक्षण टाकण्यात आले.
याच्याशेजारीच असलेल्या बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. या विषयावर मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. हा विषय मार्गी लागावा, म्हणून अनेक बैठका घेण्यात आल्या. मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. (प्रतिनिधी)

मेट्रोला प्राधान्य द्या; शेजारी शिवसृष्टी उभारा
शहराचा वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मेट्रो महत्त्वाचीच आहे. शिवसृष्टी आणि मेट्रोसाठी एकच जागा प्रस्तावित करण्यात आल्याने तिढा निर्माण झाला आहे. या जागेवर मेट्राचे स्टेशन उभारण्यास प्राधान्य द्या, मात्र शेजारच्या बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्यावर तातडीने कार्यवाही व्हावी, अशी भावना पुणेकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

बीडीपीच्या जागेवर मान्यतेसाठी पाठपुरावा
कोथरूडमध्ये बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा केला जात असल्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.

मुख्य सभेमध्ये सोमवारी शिवसृष्टीसाठी अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित केलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीचे वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, माजी उपमहापौर दीपक मानकर, रिपाइंचे गटनेते सिद्धार्थ धेंडे, मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी याला विरोध केला. शिवसृष्टीसाठी दरवर्षी निधीची तरतूद केली जाते, प्रत्येक वर्षी त्याचे वर्गीकरण केले जाते. प्रशासनाला शिवसृष्टी करायची आहे की नाही, असा सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केला. अखेर हा विषय तहकूब ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Kothrud's Shivsirtha is waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.