पिंपरीत गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी कोविड कॉल सेंटर, फोनवरून केली जाणार त्यांच्या प्रकृतीची विचारपूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 11:54 AM2021-04-19T11:54:37+5:302021-04-19T11:55:51+5:30
रुग्णांना मार्गदर्शन आणि उपचारा बाबत माहिती देण्यात येणार
पिंपरी: शहरात सद्यस्थितीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. गृहविलगीकरणातील रुग्णाला तात्काळ वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी साह्य करणे. रुग्ण अति गंभीर होण्याआधी उपचार व्हावेत. रुग्णाच्या घरातील इतर व्यक्तींना वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देणे. रुग्णांना वैद्यकीय आणि मानसिक आधार पुरविणे. यासाठी महापालिकेने कोविड कॉल सेंटर सुरू केले आहे.
याद्वारे रुग्णांना मार्गदर्शन आणि उपचारा बाबत माहिती देण्यात येणार आहे. कॉल सेंटरच्या माध्यमातून रुग्णांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. रुग्णांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जाणार आहे. यामध्ये कोणती लक्षणे आहेत. ताप, सर्दी, खोकला याची माहिती घेतली आहे. रुग्णाला काही शंका असल्यास फोन डॉक्टरांना जोडून दिला जाणार आहे. यासाठी दहा डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रुग्णांना रोज फोन करून माहिती घेण्यात येणार असल्याने रुग्णाला तत्काळ वैद्यकीय मदतची आवश्यकता भासल्यास मदत करणे पिंपरी महापालिका प्रशासनाला शक्य होणार आहे. प्रशासनाकडून दररोज कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची माहिती कॉल सेंटरला दिली जाणार आहे.
बऱ्याच रुग्णांना कोणतीही लक्षणे नसतात परंतु त्यांच्या मनात भीती असते. अशा रुग्णांचे मानोसउपचार डॉक्टरांकडून समोपदेशन केले जाणार आहे. रुग्णाच्या घरातील इतर सदस्य पॉझिटिव्ह आल्यास अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध पोहचविणे, जवळील आरोग्य केंद्राची माहिती देणे, कोविड सेंटरची माहिती देण्यात येणार आहे. रुग्णाशी फोनवर बोलून झाल्यावर त्याने दिलेल्या वैद्यकीय माहितीच्या आधारे वर्गीकरण केल्या जाणार आहे. त्यानुसार रुग्णांची माहिती कॉल सेंटरमधील डॉक्टरांना दिली जाईल. अशा प्रकारे कॉल सेंटरच्या माध्यमातून काम केले जाणार आहे.