श्रीक्षेत्र वीर येथील भक्त निवासात साकारणार कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:10 AM2021-04-20T04:10:32+5:302021-04-20T04:10:32+5:30
पुरंदर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन वीर देवस्थान ट्रस्टचे भक्त निवास अधिग्रहण करून कोविड सेंटर उभारण्यासाठी खासदार सुप्रिया ...
पुरंदर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन वीर देवस्थान ट्रस्टचे भक्त निवास अधिग्रहण करून कोविड सेंटर उभारण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप व तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्याशी देवस्थान ट्रस्टने पत्रव्यवहार करून कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी केली होती.बारामती नगरपालिकेचे नगरसेवक अमर धुमाळ, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव, राहुल धुमाळ यांनी या मागणीचा पाठपुरावा केल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी या कोविड सेंटरला तातडीने मान्यता दिली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व होप फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा अग्रवाल यांनी भक्त निवासाची पाहाणी केली असल्याचे संतोष धुमाळ यांनी सांगितले.देवस्थान ट्रस्टच्या वतीने भक्त निवास, पिण्याचे शुद्ध पाणी, लाईट व रुग्णवाहिका पुरवण्यात येणार असल्याचे सचिव अभिजित धुमाळ यांनी सांगितले.
श्रीनाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्टचा उपक्रम कौतुकास्पद असून वीर येथे सुरू होणाऱ्या कोविड सेंटरसाठी तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. परिंचे परिसरातील खासगी डॉक्टरांना येथील कोविड सेंटरला सेवा पुरवण्यासाठी विनंती करणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दिलीप धुमाळ, सरपंच माऊली वचकल, देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष रामदास धुमाळ, विश्वस्त मंडळ उपस्थित होते.
श्रीक्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथील भक्त निवासाची पाहणी करताना आमदार संजय जगताप व देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.