टाकळी हाजी येथे कोविड सेंटर होणार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:09 AM2021-04-13T04:09:31+5:302021-04-13T04:09:31+5:30
टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेमधील गावांमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत चालला असून मलठण ग्रामीण रुग्णालयात बेड शिल्लक नाही. भविष्यात ...
टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेमधील गावांमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत चालला असून मलठण ग्रामीण रुग्णालयात बेड शिल्लक नाही. भविष्यात टाकळी हाजीसह कवठे येमाई, संविदणे, मलठण, जांबुत, पिंपरखेड, परिसरात रुग्ण वाढल्यास बेड मिळणार नाही. त्यामुळे टाकळी हाजी येथे मळगंगादेवी सांस्कृतिक भवनमध्ये शंभर बेडचे सेंटर सुरु करावे, अशी मागणी माजी आमदार पोपटराव गावडे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली. मंत्र्यांनी आदेश देताच प्रशासन कामाला लागले असून तत्काळ प्रांत अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी गावाला भेट देत सांस्कृतिक भवनाच्या जागेची पाहणी करीत रुग्णांच्या सोयीसुविधेबाबत सविस्तर आढावा घेतला. प्रांताधिकारी देशमुख म्हणाले की कोविड सेंटरसाठी मळगंगा पर्यटनस्थळ सांस्कृतिक भवन ही प्रशस्त व हवेशीर जागा असून सर्व सुविधा उपलब्ध आहेत. ज्या सुविधा करणे आवश्यक आहे त्यांची पूर्तता प्रशासन करेल, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या परवानगीने हे कोविड सेंटर सुरु करता येईल.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, मंडल अधिकारी एकनाथ ढाके, ग्रामविकास अधिकारी राजेश खराडे, प्रभाकर खोमणे, समन्वयक पोपटराव पांचगे, विजय थोरात, डॉ. प्रदीप बिक्कड, डॉ. भरत सोदक उपस्थित होते.
१२ टाकळी हाजी
कोविड सेंटर सुरु करण्यासाठी जागेची पाहणी करताना संतोषकुमार देशमुख, पोपटराव गावडे, मानसिंग पाचुंदकर.