बारामतीत १०० ‘बेड’चे कोविड रुग्णालय उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:09 AM2021-04-27T04:09:52+5:302021-04-27T04:09:52+5:30
बारामती : बारामती शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी कोविड रुग्णांना उपचार मिळण्यासाठी पावले ...
बारामती : बारामती शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी कोविड रुग्णांना उपचार मिळण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. गटनेते सचिन सातव यांच्या पुढाकारातून आता १०० बेडचे रुग्णालय उभारण्यात येत आहे. त्यामुळे बारामतीकरांना आधार मिळणार आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांना दिलासा देण्याच्या सातव यांनी त्यासाठी कोविड उपचार केंद्राची उभारणी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीतील सातव कुटुंबीयांच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज प्रा. लि. व डॉ. सुनील पवार यांच्यावतीने येत्या दोन दिवसांत १०० बेड्स क्षमतेचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात येणार आहे. कसब्यातील धो. आ. सातव शाळेमध्ये हे तात्पुरते हॉस्पिटल सर्व शासकीय परवानगी घेऊन सुरू करणार असल्याची माहिती नगरपालिकेचे गटनेते सातव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बारामतीत गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. त्या तुलनेने अनेक रुग्णांना बेड्स मिळत नसल्याचे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पवार यांच्या सहकार्याने सातव कुटुंबीयातील माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, गटनेते सातव, नगरसेवक सूरज सातव, डॉ. सुहासिनी सातव, माळेगाव कारखान्याचे संचालक नितीन सातव यांच्या प्रयत्नातून हे कोविड हॉस्पिटल सुरू होणार आहे.
गटनेते सातव म्हणाले, या कोविड हॉस्पिटलसाठी १५ डॉक्टरांची टीम व सोबतचा नर्सिंग स्टाफ चोवीस तास कार्यरत असेल, याच ठिकाणी रक्त तपासणी व औषधोपचाराची सुविधा दिली जाईल. रुग्णांना येथे कोणताही त्रास होणार नाही, येथे चोवीस तास रुग्णवाहिकेचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या हॉस्पिटलमध्ये तीस ऑक्सिजनचे बेड उपलब्ध होणार आहेत. व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेनुसार येथे व्हेंटिलेटरही लावले जाणार आहेत. येथे औषधे व विविध तपासण्यांचा खर्च रुग्णांच्या नातेवाइकांना करावा लागणार आहे. इतर सर्व सुविधा मोफत पुरविल्या जाणार असल्याचे सातव म्हणाले.
——————————————
बातमी सविस्तर आवश्यक
——————————————