ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कोविड उपचार विमा भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:10 AM2021-05-26T04:10:02+5:302021-05-26T04:10:02+5:30
या कर्मचाऱ्यांपैकी बहुतांशी कर्मचाऱ्यांचा पगार अतिशय कमी आहे. यातील काही अपवाद वगळता बरेचसे कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात असल्याने त्यांना फार ...
या कर्मचाऱ्यांपैकी बहुतांशी कर्मचाऱ्यांचा पगार अतिशय कमी आहे. यातील काही अपवाद वगळता बरेचसे कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात असल्याने त्यांना फार अशा आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. कोविड संसर्गाने मृत्यू झाल्यास त्यांना भरपाई देण्याची योजना शासनाने जाहीर केली आहे. परंतु कोविड संसर्ग झाल्यास उपचाराची कोणतीही सुविधा आणि योजना या कर्मचाऱ्यांना लागू नाही.
अशा कर्मचाऱ्यांना संसर्ग झाल्यास उपचारासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये राखीव जागा ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी उपलब्ध होईल त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचार घ्यावे लागतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाईट, पिंपरी जिल्हा परिषद गटाचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना आणि मतदारसंघातील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि विस्ताराधिकारी यांना विश्वासात घेऊन जिल्हा परिषद गटातील ३२ ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या १०० कर्मचाऱ्यांना कोविड उपचारासाठी प्रत्येकी ५० हजारांचा विमा काढला आहे.
जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी स्वतःचा वाढदिवस अन्य कुठल्या प्रकारे साजरा न करता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कोविड उपचार विमा भेट देण्याचा एक प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषद गटात असा उपक्रम आणि राज्यात पहिल्यांदाच होत आहे. 'आम्ही नेहमीच समाज उपयोगाचे काही करावे हा माझा प्रयत्न असतो. त्याचाच हा एक भाग आहे, असे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
--------------------------------------------------------
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विमा पॉलिसी किंवा शरद बुट्टे पाटील