कोयत्याने वार करणाऱ्यास कोठडी
By admin | Published: July 17, 2017 04:21 AM2017-07-17T04:21:07+5:302017-07-17T04:21:07+5:30
कौटुंबिक हिंसाचाराचा खटला मागे घेण्यास नकार दिल्याच्या रागातून बायकोच्या भावावर कोयत्याने हल्ला करत त्याला गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कौटुंबिक हिंसाचाराचा खटला मागे घेण्यास नकार दिल्याच्या रागातून बायकोच्या भावावर कोयत्याने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी एकास चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी दिले.
मारुती रामा रेवडे (वय २८, रा. मु.पो. आनाळा, रेवडेवस्ती, ता. परंडा, जि. उस्मानाबाद) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी अर्जुन संतू रोमण (वय ६०, रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. अशोक अर्जुन रोमण (वय २४) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर अन्य एकावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात यापूर्वी दोघांना अटक केली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. २५ जानेवारी रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास बाणेर परिसरात ही घटना घडली.
फिर्यादी संशयिताचे सासरे आहेत. सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याप्रकरणी फिर्यादी यांच्या मुलीने आरोपी व त्याच्या आई-वडिलांविरोधात उस्मानाबादमधील आंबी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रार मागे घेण्यास सांगूनही ती मागे न घेतल्याने संशयिताने साथीदाराच्या मदतीने अशोक रोमण यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. याप्रकरणी त्याविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी त्याला अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. तो गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याचे अन्य कोणी साथीदार आहेत का, तसेच अधिक तपासासाठी सहायक सरकारी वकिलांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली.