कोयना अभयारण्यावर ६५ प्राण्यांच्या जाती; झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियातर्फे दोन पुस्तकांचे प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 11:18 AM2022-05-23T11:18:24+5:302022-05-23T11:27:47+5:30
कोयना अभयारण्यातील प्राण्यांविषयी अभ्यास करून पुस्तक प्रकाशन...
पुणे : झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे पुण्यात वेस्टर्न रिजनल सेंटर आहे. या सेंटरने आतापर्यंत १ लाख ९१ हजार ३८९ प्राण्यांचे जतन केले असून, त्यातील ८५ हजार १३९ जणांना नाव आहे, तर १ लाख ६ हजार २५० नाव नसलेले प्राणी आहेत, तसेच सेंटरने १९५९ पासून आजपर्यंत शंभर नवीन प्राण्यांचा शोध लावला आहे, अशी माहिती वेस्टर्न रिजनल सेंटरचे शास्त्रज्ञ व सेंटर प्रमुख डॉ. बासुदेव त्रिपाठी यांनी दिली. कोयना अभयारण्यातील प्राण्यांविषयी अभ्यास करून पुस्तक प्रकाशन करण्यात आले.
सेंटरचे संग्रहालयदेखील असून, त्यामध्ये ५०० प्राण्यांचे नमूने पाहायला मिळतात. त्यात बिबट, ससा, सांबर, माळढोक, धनेश, मासांचे विविध प्रकार, कोळीचे प्रकार, सरपटणारे प्राणी, पक्षी आदींचा समावेश आहे. जैवविविधतेचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी सेंटरकडून विविध उपक्रम राबविले जातात. शाळा, महाविद्यालयांत कार्यक्रम घेतले जातात. नुकतेच सेंटरमधील शास्त्रज्ञांनी ‘फौना ऑफ कोयना वाइल्ड लाइफ सॅक्नचुरी’ आणि ‘फौना ऑफ नवेगाव नॅशनल पार्क’ या दोन विषयांवर पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यामध्ये शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष जाऊन केलेल्या संशोधनाची माहिती, छायाचित्रे आहेत. हा एक संग्रही ठेवण्यासाठी व संशोधकांसाठी अतिशय मौलिक ठेवा आहे. या कामासाठी झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, कोलकाताचे संचालक डॉ. धृती बॅनर्जी यांनी सहकार्य केले. पुणे सेंटरमधील डॉ. के. पी. दिनेश, डॉ. एस. एस. तळमळे यांनीदेखील या पुस्तकांच्या कामात मोलाची मदत केली आहे.
कोयना अभयारण्यातील विविधता
- प्राणी - ६५ जाती
- पक्षी - २६९
- उभयचर - २१
- गोडे पाण्यातील मासा - ६२
-कीटक, फुलपाखरं - १७५
- ड्रॅगन फ्लाय व इतर - ६९
- इतर प्राणी, मासे - २५७
- एकूण ९१८
सह्याद्री हा पश्चिम घाटाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी खूप मोठी जैवविविधता आहे. या सह्याद्रीमध्ये जितके संशोधन करू तितके कमीच आहे. त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर संशोधनाची आवश्यकता आहे. काही प्रदेशनिष्ठ फुले, वनस्पती येथेच पाहायला मिळतात. त्यादृष्टिकोनातून आमचे शास्त्रज्ञ तिथे जाऊन अभ्यास करतात.
- डॉ. बासुदेव त्रिपाठी, प्रमुख, वेस्टर्न रिजनल सेंटर, झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया