कोयनेच्या जंगलातील किल्ला "वार्क्षदुर्ग वासोटा"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 03:11 PM2022-10-17T15:11:08+5:302022-10-17T15:13:13+5:30
वासोटा उर्फ व्याघ्रगड आपल्याला लक्षात राहतो, तो मुळात कोयनेच्या जंगलातील किल्ला म्हणून
गणेश खंडाळे
वासोटा उर्फ व्याघ्रगड आपल्याला लक्षात राहतो, तो मुळात कोयनेच्या जंगलातील किल्ला म्हणून. नंतर लक्षात राहतो, तो ताई तेलीण या पेशवाईला डोकेदुखी ठरलेल्या रणधुरंदर स्त्रीमुळे. मोठमोठे वृक्ष काटेरी झाडे, वेली, बांबूची बेटे यांनी व्यापलेला गच्च वनात असलेला किल्ला याला स्मृतींमध्ये वार्क्षदुर्ग असे म्हटले गेले आहे. शिवभारत या ग्रंथातल्या सहाव्या अध्यायात गिरीदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग व स्थलदुर्ग यांचे वर्णन येते. रामायण काळातही वार्क्षदुर्ग आढळतात. कोकण आणि देश यांच्या सरहद्दीवर उभ्या असलेल्या वासोट्याला या दोन्ही ठिकाणांवरून जाता येते. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून समांतरपणे दक्षिणोत्तर अशी बामणोलीची उपडोंगररांग धावते. या दोन डोंगररांगांमध्ये कोयनानगरच्या शिवसागर जलाशयाचे पाणी (बॅकवॉटर अगदी तापोळ्यापर्यंत, म्हणजे ५०-६० किलोमीटर) पसरलेले आहे. या पाण्यामुळेच अद्यापही येथील जंगल आणि वन्यजीव मानवी हस्तक्षेपापासून दूर राहिले आहेत.
कसे जाल
साताऱ्यातून बामणोलीसाठी एसटी मिळते.
पुणे - सातारा - येवतेश्वर - कास - बामणोली
कोकणातून - खेड चोरवणे मार्गे
बामणोली गावातील चेकपोष्टवर किल्ल्यावर जाण्यासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे. नोंदणी केल्यावर शिवसागर जलाशयातून लॉंचने १६ किमी पार करून दीड तासात मेट इंदवली या किल्ल्याच्या पायथ्यला जायचं. लॉंच १० ते १२ जणांचा गट असल्यास आर्थिक फायद्याची ठरते. त्यामुळे तश्या मोठ्या गटाने गेल्यावर लॉंचसाठी अधिक खर्च येत नाही.
काय पाहाल
नागेश्वर मंदिर, काळकाई मंदिर, महादेव मंदिर, बाबूकडा, कोयना जलाशय
उत्तर पेशवाईत दुसन्या बाजीरावांचे परशुरामपंत प्रतिनिधींशी संबंध बिघडले. त्यांनी दौलतराव शिंदेंना ससैन्य पाठवून प्रतिनिधींना कैद केले. बाजीरावाने या काळात ६ वर्षे प्रतिनिधींच्या मुलखाकडे लक्ष दिले नाही. याचाच फायदा घेऊन ताई तेलिणीने पेशव्यांसमोर आव्हान उभे केले. तिने धन्याची जहागीर वाचावी, म्हणून स्थानिक जनतेतून थोडे सैन्य उभे करून वासोट्यावर आपले लष्करी केंद्र उभारले. तिने कमळगड, मकरंदगड, जंगली जयगड, मोरगिरी इत्यादी किल्ले ताब्यात घेतले. दक्षिणेचा व पूर्वेचा असा ६५ किलोमीटर प्रदेश जिंकला. शेवटी ताई तेलिणीचे हे बंड मोडून काढण्यासाठी पेशव्यांनी सेनापती बापू गोखलेंना पाठविले. त्यांनी अगोदर आपल्या प्रतिनिधींना ताई तेलिणीच्या समाचारासाठी पाठविले; पण तिच्या सैन्याने सर्व हल्ले यशस्वीपणे परतवले. म्हणून खुद्द बापूंना रणांगणात उतरावे लागले. बापूंनी आपला दरारा दाखविला. कर्नाटकात विजय मिळवून सेनापती गोखले परतीच्या प्रवासात कराडपूर्वी खानापूर तालुक्यात वांगी गावी आले. पावसाळा असूनही विश्रांती न घेता, त्यांनी ताई तेलिणीवर स्वारी केली. जुलै १८०७ ते एप्रिल १८०८ या काळात तिने जिंकलेला सर्व प्रदेश व किल्ले सेनापतींनी परत जिंकून घेतले. याला अपवाद एकच होता वासोटा.
कोयनानगर ते महाबळेश्वरजवळील तापोळा या साधारणपणे ७० ते ७५ किलोमीटरच्या पट्ट्यात हे अभयारण्य पसरले आहे. ढोबळमानाने याचे तीन प्रमुख भाग पडतात. पहिला महारखोरे, दुसरा वासोटा आणि तिसरा मेट इंदवली. एका बाजूला नैसर्गिक कडा, तर दुसऱ्या बाजूला मानवनिर्मित जलाशय, त्यामुळे या जंगलाला एक प्रकारे जंगलतोडीपासून अभयच मिळाले आहे. कोयनेसोबतच सोळशी व कांदाटी या नद्याही याच अभयारण्यातून वाहतात. जून ते सप्टेंबरच्या दरम्यान इथे प्रचंड पाऊस पडतो. त्याची वर्षाची सरासरी सुमारे पाच हजार मिमी आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्राण्यांची सर्वाधिक घनता याच अभयारण्यात आहे. सर्वसाधारणपणे आढळणारे भारतीय प्राणी येथेही आढळतात. येथे बिबट्याचे दर्शन नशीबवंतांना होते. दिवसा व रात्रीच्या डरकाळ्यांच्या आवाजाने आणि ठश्यांवरून येथे वाघ आहेत, हे सिद्धही होते, परंतु सहसा ते कोणाला दिसत नाहीत. साधारणपणे येथे फिरणाऱ्या ट्रेकर्सना नेहमी अस्वल दिसते, बरेचदा आमना-सामनाही होतो. त्यामुळे भयापोटी ट्रेकर्स फटाके वाजवत जंगलातून फिरायचे. मात्र, आता फटाके वाजवायला येथे पूर्णपणे बंदी आहे. येथील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राक्षसी खारी शेकरु. भीमाशंकर येथे आढळणाऱ्या खारींपेक्षा या थोड्या वेगळ्या आहेत.