Pune Crime: कोयत्याने वार करणाऱ्या फहीम खान टोळीचा येरवडा जेलमध्ये मुक्काम, ‘मोक्का’नुसार कारवाई
By नितीश गोवंडे | Published: December 15, 2023 05:22 PM2023-12-15T17:22:22+5:302023-12-15T17:22:53+5:30
हा प्रकार १२ नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास मार्केट यार्ड येथील गल्ली नंबर ११ येथे घडला होता....
पुणे : मार्केट यार्ड परिसरात फटाके फोडण्यावरून एका तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फहीम खान व त्याच्या अन्य २ साथीदारांवर पोलिस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. याप्रकरणी कुमार राम कांबळे (२०, रा. आंबेडकर नगर, मार्केट यार्ड) याने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फहीम फिरोज खान (२१), शाहरुख सलीम खान (२१, सर्व रा. आंबेडकर नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली असून आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत. तर त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. हा प्रकार १२ नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास मार्केट यार्ड येथील गल्ली नंबर ११ येथे घडला होता.
मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करून अपर पोलिस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. या प्रकरणाचा पुढील तपास वानवडी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे करत आहेत.
ही कामगिरी परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त आर राजा, सहायक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्वप्नाली शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक कैलास डाबेराव, पोलिस उपनिरीक्षक चेतन भोसले, सर्व्हेलन्स पथकातील पोलिस अंमलदार अमरनाथ लोणकर, चव्हाण यांच्या पथकाने केली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत ९८ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.