Pune: कोयत्याने मुलावर वार; टोळक्याने वाहने फोडली! पर्वती दर्शन भागात दहशत
By नम्रता फडणीस | Published: January 30, 2024 04:20 PM2024-01-30T16:20:39+5:302024-01-30T16:22:04+5:30
या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, दोन्ही गटांतील बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला....
पुणे : पर्वती दर्शन परिसरात टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केली. टोळक्याने एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केले. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, दोन्ही गटांतील बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सीता नितीन शेंडगे (वय ३३, रा. शिवराज मित्रमंडळाजवळ, पर्वती दर्शन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलासह श्री देवेंद्र, अजय चव्हाण, सोन्या गेजगे, शुभम अडागळे यांच्यासह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलाचा शेंडगे यांचा पुतण्या अथर्व याच्याशी वाद झाला होता. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अल्पवयीन मुलगा देवेंद्र, चव्हाण, अडागळे आणि साथीदार शिवराज मित्रमंडळाजवळ आले. त्यांनी कोयते उगारून दहशत माजविली. अथर्व याच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. अथर्वने वार चुकविला. घराच्या दरवाजावर कोयता आपटून आरोपींनी शिवीगाळ केली. परिसरातील दुचाकी, टेम्पो, रिक्षांच्या काचा फोडल्या तसेच बीअरची बाटली रस्त्यात फोडली, असे शेडगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक मुळीक तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलाला बांबूने बेदम मारहाण केल्याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार पर्वती पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. याबाबत अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अथर्व प्रदीप शेंडगे (वय १९), नीलेश अशोक चंदनशिवे, राजरतन सुनील गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे साथीदार कृष्णा देवेंद्र, आफन शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.