क्रांतिवीर नाईक स्मारकाला धोका नाही

By admin | Published: May 3, 2017 02:52 AM2017-05-03T02:52:08+5:302017-05-03T02:52:08+5:30

शहराच्या मध्यवर्ती भागातून पुणे मेट्रो भूमिगत मार्गाने जाणार असली, तरी या मार्गामुळे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक स्मारक, मामलेदार

Krantiveer Naik is not a threat to the monument | क्रांतिवीर नाईक स्मारकाला धोका नाही

क्रांतिवीर नाईक स्मारकाला धोका नाही

Next

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातून पुणे मेट्रो भूमिगत मार्गाने जाणार असली, तरी या मार्गामुळे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक स्मारक, मामलेदार कचेरी किंवा खडक पोलीस ठाण्याला कोणताही धोका नाही, असे महामेट्रो कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या मार्गाचे अद्याप सर्वेक्षण सुरू असून, अलाइनमेंट (मार्गाची आखणी) अंतिम झालेली नाही, असे कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटना यांनीही उमाजी नाईक यांचे स्मारक असलेल्या मामलेदार कचेरी येथील स्मारकाबाबत महामेट्रो कंपनीकडून माहिती घेतली. त्यांनाही कंपनीच्या वतीने असेच सांगण्यात आले. या स्मारकाला धोका असल्याचे वाचनात आल्यानंतर समाजाच्या भावना दुखावल्या.
मात्र, कंपनीकडून माहिती घेतल्यानंतर त्यांनी स्मारकाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे संघटनेचे पदाधिकारी अप्पासाहेब चव्हाण यांनी सांगितले.
अखिल महाराष्ट्र बेडर, बेरड, रामोशी समाज कृती समितीच्या वतीने या संदर्भात महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेण्यात आली. दौलत नाना शितोळे, बबनराव खोमणे, अनंता चव्हाण, सुनील चव्हाण, गोरखनाथ गोफणे, शारदा गोफणे, शारदा खोमणे, कल्पना गुळवे, गंगाराम जाधव, आदिनाथ खंडागळे, संतोष चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते. महामेट्रोच्या भूमिगत मार्गात हे स्मारक येत असेल तर मार्ग किंवा त्यावरील भूमिगत स्थानक दुसऱ्या रस्त्याने न्यावे व तेथील मेट्रो स्थानकाला क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे नाव द्यावे, अशी मागणी या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली.
(प्रतिनिधी)

मार्ग सर्वांसाठी करणार खुला
महामेट्रोचे तज्ज्ञ अधिकारी या भूमिगत मार्गासाठी परिसराची पाहणी करीत आहेत. अद्याप हे सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही, त्यामुळे त्यात काही इमारती किंवा स्मारके यांचे स्थलांतर करण्याचा प्रश्नच येत नाही. त्याबाबतीत आता काहीच सांगता येत नाही.
सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर, महामेट्रो कंपनी त्यात निश्चित झालेला मार्ग काम सुरू होण्याआधी सर्वांसाठी खुला करेल व त्यानंतर त्यावर अंतिम निर्णय होईल, अशी माहिती महामेट्रो कंपनीच्या वतीने देण्यात आली.

Web Title: Krantiveer Naik is not a threat to the monument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.