"कोरोना से मरेंगे कम, लॉकडाऊन से मरेंगे हम", माहिती फलके घेऊन व्यापाऱ्यांनी केले आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 12:06 PM2021-04-08T12:06:52+5:302021-04-08T12:36:41+5:30
लक्ष्मी रस्त्यावर केली सहा फुटाच्या अंतराची मानवी साखळी
कोरोना से मरेंगे कमी, लॉकडाऊन से मरेंगे हम अशी माहितीफलके हातात घेऊन राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या निर्णयाविरोधात पुणे व्यापारी महासंघाने लक्ष्मी रस्त्यावर आंदोलन केले.
राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आज पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने काळ्या फितीहि लावण्यात आल्या. जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीज ते नाना पेठेतील क्वॉर्टर गेटपर्यंत सहा फुटांचे अंतर ठेवत साखळी करण्यात आली. यावेळी, व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाचा निषेध, मेरा पेट मेरी मजबुरी, दुकान खोलना है जरूरी आदी माहितीपर फलक झळकाविण्यात आले. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या आंदोलनात दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह व्यावसायिक सहभागी झाले होते.
राज्य सरकार व पुणे महापालिका प्रशासनाने नव्याने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊन नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयाविरोधात व्यापारी वर्गांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे व्यापारी महासंघातर्फे दोन दिवसीय तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे.
सर्व पुणे व्यापारी महासंघाशी संलग्नित शहरातील व्यापारी संघटना आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील किरकोळ व घाऊक अशी जवळपास ४० हजार दुकाने बंद आहेत. यामध्ये, शहरातील मध्यवर्ती भागाबरोबरच पेठांमधील सराफ, होजिअरी व कापड, ऑटोमोबाईल, प्लायवूड, टिंबर, स्टेनलेस स्टील, नॉन फेरस मेटल, पेपर, प्लास्टिक, इलेक्ट्रिक अॅन्ड इलेक्ट्रॉनिक, मशिनरी व वेल्डींग, कॉम्पुटर, टॉईज, वॉच, सायकल, केमिकल निगडीत व्यापाऱ्यांचा समावेश आहे. या बाजारपेठांमधून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात साहित्य पाठविले जाते. बंदमुळे पुरवठा साखळी खंडीत झाली असून, सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.