‘कुकडी प्रकल्पात’ यंदा तीन टीएमसी पाणी कमी
By Admin | Published: November 4, 2014 03:59 AM2014-11-04T03:59:50+5:302014-11-04T03:59:50+5:30
ज्या कुकडी प्रकल्पावर जुन्नर, आंबेगाव, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा तालुक्यांतील हजारो हेक्टर शेतीचा पाणीप्रश्न अवलंबून आ
येडगाव : ज्या कुकडी प्रकल्पावर जुन्नर, आंबेगाव, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा तालुक्यांतील हजारो हेक्टर शेतीचा पाणीप्रश्न अवलंबून आहे, त्या कुकडी प्रकल्पात मागील वर्षीपेक्षा पावणेतीन टीएमसी कमी पाणीसाठा आहे. टक्केवारीमध्ये ९ टक्के
इतका आहे.
सध्या कुकडी प्रकल्पात २५६६६ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, मागील वर्षी आजच्या तारखेला २८४२६ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा होता.
या वर्षी कुकडी प्रकल्पातील कमी पाणीसाठ्यामुळे लवकरच पाणीटंचाईच्या झळा बसणार असल्याचे चित्र या आकडेवारीवरून दिसते. सध्या कुकडी प्रकल्पातून रब्बीचे पहिले आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे पाण्यासाठी या वर्षी शेतकऱ्यांना चांगलाच संघर्ष करावा लागणार की काय? असा प्रश्न आहे.
मागील वर्षी आजच्या तारखेला प्रकल्पात ९३ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. आज तो टक्केवारीमध्ये ८४ टक्के इतका असून, ९ टक्के इतका कमी आहे.
यामुळे या वर्षी पाणी नियोजन अतिशय काटेकोरपणे व राजकीय हस्तक्षेप न होता जर व्यवस्थित झाले तर शेतकऱ्यांचा उन्हाळा सुखकर जाईल. नाहीतर शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचाच सामना करावा लागणार असल्याचे अनेक जाणकारांकडून बोलले जात आहे. पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवणार नाही, असेच नियोजन पाटबंधारे विभागाने करावे, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)