कुल-थोरात यांच्यात कलगीतुरा
By admin | Published: May 29, 2017 02:09 AM2017-05-29T02:09:00+5:302017-05-29T02:09:00+5:30
भीमा सहकारी साखर कारखान्याचा कर्जाचा डोंगर रमेश थोरात यांनी केला असल्याचा आरोप सातत्याने आमदार राहुल कुल करीत
लोकमत न्यूज नेटवर्क
दौंड : भीमा सहकारी साखर कारखान्याचा कर्जाचा डोंगर रमेश थोरात यांनी केला असल्याचा आरोप सातत्याने आमदार राहुल कुल करीत असतात. परंतु, हा आरोप माझ्यावर नसून त्यांचे वडील तत्कालीन भीमा पाटसचे अध्यक्ष सुभाष कुल यांच्यावर करीत असल्याचे रमेश थोरात यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मी कारखान्याचा उपाध्यक्ष होतो. काही अधिकार मला जरी मिळाले होते तरी कारखान्याचे अध्यक्ष सुभाष कुल होते. त्यावेळी ते तालुक्याचे आमदारदेखील होते. तेव्हा कारखान्यात जे काही निर्णय व्हायचे ते दोघांच्या संगनमताने व्हायचे. मी कारखान्यावर कर्ज करीत असताना सुभाष कुल हे गप्प बसले असते का? तेव्हा त्या वेळी कारखान्याची जी काही जबाबदारी होती. ती आमच्या दोघांवर होती आणि ती जबाबदारी आम्ही दोघांनीही समर्थपणे पार पाडलेली आहे.
इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत भीमा पाटसने सभासदांना भाव दिलेला आहे. कामगारांचे पगार आणि बोनस कधीही थकलेले नव्हते. आमच्या कारकिर्दीत कारखान्यावर ३८ कोटी रुपयांचे कर्ज होते. परंतु त्या तुलनेत कारखान्याकडे ७५ कोटींची साखर शिल्लक होती. कुल यांच्याकडे काही वर्षांपासून कारखान्याची सत्ता आहे. तेव्हा कारखान्यावर ४०० कोटींचे कर्ज असून जी काही साखर शिल्लक आहे. तिलादेखील लालसर रंग आला आहे. कामगारांचे पगार व इतर देणी थकली आहेत. सभासदांच्या पेमेंटचाही प्रश्न प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत आर्थिक अडचणीतून मार्ग काढत आहे, असे अनेक वर्षांपासून राहुल कुल सांगत आहेत. मात्र आर्थिक अडचणीतून बाहेर निघाला नाही. कारखान्याचे हे विस्तारीकरण बोगस पद्धतीने केल्यामुळे अडचणीत आला. मात्र गेल्या हंगामात कारखाना बंद राहिला. हा कारखाना सुरू व्हावा, कामगार व सभासदांचीही तसेच माझीदेखील प्रामाणिक इच्छा आहे. मात्र सुरू झाल्यानंतर पुन्हा कर्जाचा डोंगर राहता कामा नये. दौंड शुगर सुरू होऊन ९ वर्षे झाली. रिकव्हरी २ वर्षांत कमी झालेली आहे. परिणामी खासगी कारखान्यामुळे भीमा पाटसला फटका बसला, असे चुकीचे समर्थन राहुल कुल करीत असल्याचे रमेश थोरात म्हणाले.
शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवले
दौंड शुगर कारखाना उभारण्यासाठी मी एजंटगिरी केली, असे राहुल कुल म्हणतात. परंतु हा कारखाना उभारणीसाठी शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेवले. त्यानुसार त्याचे फलित आज पूर्व भागातील शेतकऱ्यांना मिळत आहे. दौंड शुगर नसता तर पूर्व भागातील शेतकऱ्यांचे हाल झाले असते. त्यामुळे हा कारखाना या भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेला आहे.
माझे वडील अध्यक्ष होते, मात्र अधिकार कुणाला होते : राहुल कुल
दौंड : भीमा पाटस कारखान्याचे माझे वडील सुभाष कुल हे अध्यक्ष होते. परंतु कारखान्याचे अधिकार कोणाला होते, हे तालुक्यातील जनतेला माहित आहे. मी कारखान्याची सत्ता हाती घेतली त्या वेळेस १०० कोटींच्या पुढे कर्ज होते. हे कर्ज फेडता फेडता कारखाना अडचणीत आला. माझी सत्ता नसताना कारखान्यातील पूर्वीचे कर्ज मी प्रामाणिकपणे फेडत आलेलो आहे. सध्याच्या परिस्थितीत काही तांत्रिक अडचणीमुळे कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला आहे. तरीदेखील पुढील हंगामात भीमा पाटस कारखाना सुरू होईल, असा विश्वास करखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांनी पत्रकार परिषेदत केले.
एका ट्रॅक्टरवर चार बँकांची कर्जे घेतली, असाही आरोप माझ्यावर होतो. तेव्हा काही ट्रॅक्टरवर चार बँकांचे कर्ज घेतले असतील ते कारखान्याच्या हितासाठी घेतले आणि या कर्जाला गॅरंटी असते. कारखान्याची रिकव्हरी टिकविणे ही कोणा एकट्याची जबाबदारी नसते, तर ती जबाबदारी सर्वांची असते. जर सर्वांचे सहकार्य मिळाले असते तर रिकव्हरीदेखील चांगली झाली असती. रमेश थोरात यांनी भीमा पाटस कारखान्यात त्यांचा स्वत:चा ऊस काही प्रमाणात घातलेला आहे. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी ऊस जर घातला असता तर कारखान्याला मदत झाली असती.
मी आमदार होऊन अडीच वर्षे झाली. परंतु या अडीच वर्षांत बरीच विकासकामे केली. जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे झाली. जे रमेश थोरात यांनी त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत पाच वर्षांत कामे केली असतील त्या तुलनेत दुप्पट कामे मी अडीच वर्षांत केलेली आहेत. तेव्हा त्यांनी पाच वर्षांत काय कामे केली, ती कामे प्रसिद्ध करावीत आणि मी अडीच वर्षांत काय केले हेदेखील मी प्र्रसिद्ध करायला तयार आहे, असे राहुल कुल म्हणाले.
सर्वांनी हातभार लावावा
भीमा पाटस कारखाना सध्याच्या परिस्थितीत अडचणीत आहे, अशा परिस्थितीत कारखान्याच्या संदर्भात कुणीही राजकारण न करता हा कारखाना सुरू होण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा,जेणेकरून ऊसउत्पादक सभासद आणि कामगार यांचे हित जोपासले जाईल आणि कारखाना सुरळीत सुरू राहील, असे राहुल कुल म्हणाले.