टिळक कुटुंबात उमेदवारी न दिल्याची खंत, पुढील वाटचालीबाबत कुणाल टिळक यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 03:15 PM2023-02-06T15:15:48+5:302023-02-06T15:16:32+5:30
Kunal Tilak News: आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुण्यातील कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुण्यातील कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, रासने यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक आणि पती शैलेश टिळक यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
टिळक कुटुंबात उमेदवारी देण्यात आली नाही, याबाबत विचारणा केली असता शैलैश टिळक म्हणाले की, कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबात उमेदवारी देण्यात न आल्याची थोडी खंत वाटतेय. कारण आईंनी पक्षनिष्ठेचं उदाहरण देशासमोर दिलं होतं. त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबाचा विचार करण्यात यावा आणि निवडणूक बिनविरोध करण्यात यावी, अशी आमची मागणी होती. पण शेवटी पक्षाने निर्णय घेतलेला आहे. असं असलं तरी आम्ही पक्षाच्या विरोधात जाणार नाही. भाजपाचंच काम आयुष्यभर करत राहणार, तसेच पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करणार, असेही कुणाल टिळक यांनी स्पष्ट केले.
तर मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी सांगितले की, घरामध्ये उमेदवारी दिली नाही म्हणून आम्ही अजिबाच नाराज नाही. आम्ही पक्षाचा निर्णय आधीच मान्य केला आहे. पक्षासोबत राहणार हे पक्षश्रेष्ठींना आधीच सांगितलं आहे. मात्र पत्नी गेल्याचा जो धक्का आहे, त्यातून सावरायला थोडा वेळ लागेल.
दरम्यान, शैलेश टिळक यांनी कसब्यातून उमेदवारीसाठी मागणी केली होती. परंतु त्यांना डावलून हेमंत रासने याना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे टिळक कुटुंबीयांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. जेव्हा खुद्द हेमंत रासने यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेतली तेव्हा शैलेश टिळक यांनी पक्षावर नाराज नसल्याचे सांगितले होते. परंतु आज दोघेही रॅलीत उपस्थिती न राहिल्याने नाराजीबद्दल विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.