कुंदन शहा एक ग्रेट दिग्दर्शक होते ,‘जाने भी दो यारो’ चित्रपटाचा फर्स्ट लूक सगळयांनाच आवडला - अमित त्यागी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 10:17 PM2017-10-07T22:17:51+5:302017-10-07T22:17:59+5:30
एफटीआयआयमधून बाहेर पडल्यानंतर उत्तरप्रदेशला परतलो होतो...अचानक एक टेलिग्राम आला...जो कुंदन शाह यांचा होता.
पुणे - एफटीआयआयमधून बाहेर पडल्यानंतर उत्तरप्रदेशला परतलो होतो...अचानक एक टेलिग्राम आला...जो कुंदन शाह यांचा होता...‘जाने भी दो यारो’चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टरची पोस्ट खाली आहे तू येशील का?
त्यावेळी मी त्यांना फारसा ओळखत नव्हतो..फक्त ते माजी विद्यार्थी आहेत एवढेच माहिती होते...त्यांचा टेलिग्राफ हातात पडल्यानंतर तडक मुंबई गाठली...राहायला घर नव्हते...तीन दिवस त्यांनी आपल्याकडे मला ठेवूनघेतले....माझ्या चुकाही ते मला मनमोकळेपणे सांगायचे....एके दिवशी साऊंड रेकॉर्डिंग करीत असताना त्यांनी मला अचानक एका प्रसंगामध्ये नसरूददीन शाह यांच्याबरोबर अभिनय करण्यासाठी उभे केले..पण माझा आवाज आधीच चित्रपटात वापरला गेला असल्यामुळे मला दुस-याचा आवाज दिला गेला....कुंदन शहा यांच्या आठवणींचा एकेक कप्पा एफटीआयआयमधील चित्रपट विभागाचे अधिष्ठाता अमित त्यागी ‘लोकमत’शी बोलताना उलगडत होते.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ( एफटीआयआय) मधील कुंदन शहा हे 1973 ते 1976 दरम्यानचे दिग्दर्शनाचे विद्यार्थी. दोन वर्षानंतर अमित त्यागी यांनीएफटीआयआयमध्ये प्रवेश घेतला. दोघांचा एकमेकांशी फारसा परिचय नव्हता. केवळ ‘नमस्ते’ इथपर्यंतच ही ओळख सीमित होती. खरा संबंध आला तो ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाच्या निमित्ताने. या चित्रपटामध्ये त्यागी यांनी संवादक, अभिनेता आणि असिस्टंट डायरेक्टर अशा तीन जबाबदा-या पेलल्या ..या चित्रपटानंतर दोघांमध्ये एक भावनिक नाते तयार झाले होते.
कुंदन शहा हे खूपच मितभाषी आणि मृदु स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. ज्यावेळी ‘जाने भी दो यारो’ चित्रपटाचा फर्स्ट लूक वरिष्ठांनी पाहिला तेव्हा सगळेच चकित झाले, अरे पहले कहॉं छिपा था ये बंदा’...इसका काम बोलता है, असे म्हणत ते एक ग्रेट दिग्दर्शक आहेत...याची जाणीव सर्वांना झाली होती. आजही तीस वर्षांनंतरही हा चित्रपट लोकांना भावतो, यातच सगळे आले. हा चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील माईल्डस्टोन म्हणता येईल. एखादा गंभीर विषय विनोदी ढगांनी कशापद्धतीने हाताळला जाऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे. गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ दिग्दर्शक हषीकेश मुखर्जी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या ‘स्मरणांजली’ या कार्यक्रमासाठी आयत्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलवले होते मात्र कोणतेही आढेवेढे न घेता ते आले होते, एफटीआयआयशी त्यांचे ॠणानुबंध जुळले असल्याने ते इथे यायला कधीही नकार देत नसत असे त्यागी यांनी सांगितले.