आळंदीच्या उपनगराध्यक्षपदी कुऱ्हाडे बिनविरोध
By admin | Published: February 18, 2017 02:44 AM2017-02-18T02:44:58+5:302017-02-18T02:44:58+5:30
आळंदी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे यांची, तर स्वीकृत सदस्यपदी सविता रामशेठ गावडे आणि दिनेश रामदास घुले
शेलपिंपळगाव : आळंदी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रशांत कुऱ्हाडे यांची, तर स्वीकृत सदस्यपदी सविता रामशेठ गावडे आणि दिनेश रामदास घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष सभेत या निवडी घोषित करण्यात आल्या.
याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ. संतोष टेंगले, आमदार बाळा भेगडे तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पीठासीन अधिकारी वैजयंता उमरगेकर यांनी आज दुपारी येथील टाउन हॉलमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम सुरु केला. उपनगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या वतीने प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले तर शिवसेनेकडून शैला तापकीर या तिघांनी अर्ज दाखल केले होते.
मात्र गिलबिले आणि तापकीर यांनी माघार घेतल्याने प्रशांत कुऱ्हाडे यांना बिनविरोध उपनगराध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले.
त्यानंतर स्वीकृत सदस्यपदासाठी निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली. दरम्यान स्वीकृत सदस्यपदासाठी एकूण सतरा जणांचे अर्ज आले होते. त्यामध्ये रामचंद्र रंधवे, प्रवीण बवले, दत्तू टेमगिरे, माधवी चोरडिया, भागवत आवटे, सुरेश झोंबाडे या सहा जणांचे अर्ज छाननीप्रक्रियेत प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी अवैध ठरविले. उर्वरित अकरा अर्जांपैकी भाजपाच्या वतीने दिनेश घुले आणि सेनेच्या वतीने सविता गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी भाजपाचे गटनेते पांडुरंग वहिले आणि सेनेचे गटनेते आदित्य घुंडरे यांनी मोलाची भूमिका बजावली.
निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा नगर परिषदेच्या तसेच ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. श्री ज्ञानोबा माऊलींच्या दर्शनानंतर पदाधिकाऱ्यांची शहरातून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. (वार्ताहर)