कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत रसायनांचा साठा रस्त्यावरच!; प्रदूषण मंडळाचे अधिकारी गप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:54 PM2018-01-24T13:54:12+5:302018-01-24T13:58:12+5:30
कुरकुंभ (ता. दौंड) येथील रासायनिक प्रकल्पातील घडामोडी काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. ‘मेल्झर केमिकल्स’ या कंपनीतील अतिरिक्त रसायनांचा व रासायनिक उत्पादनाचा साठा त्यांनी चक्क रस्त्यावरच केला आहे.
कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील रासायनिक प्रकल्पातील घडामोडी काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. काही दिवसांपूर्वी ‘मेल्झर केमिकल्स’ या कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून सांडपाणी उघड्यावर सोडल्याप्रकरणी वीज, पाणी बंद केले होते. मात्र, कंपनी प्रशासनाने अगदी दोनच दिवसांत ते पुन्हा चालू केले. विशेष म्हणजे या कंपनीतील अतिरिक्त रसायनांचा व रासायनिक उत्पादनाचा साठा त्यांनी चक्क रस्त्यावरच केला आहे.
सोमवार (दि. २२) रोजी प्रदूषण मंडळाचे अधिकारी सूर्यकांत शिंदे यांनी या परिसराची पाहणी केली असता त्यांना हा प्रकार आढळून आला. मात्र तरीदेखील यावर काहीही प्रतिक्रिया देण्याचे त्यांनी टाळले आहे.
इतकेच नव्हे तर ज्या मेल्झर केमिकल्सला त्यांनी वीज, पाणी पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली त्याच कंपनीच्या आतून रासायनिक सांडपाण्याचा प्रवाह वाहत असल्याचे देखील आढळून आले आहे. मात्र, याबाबतदेखील त्यांनी बोलायचे टाळले. फक्त या कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना सदर पाणी बंद करा, असा तोंडी आदेश देऊन निघून गेले.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात रासायनिक सांडपाणी, अवैध रासायनिक साठा, अवैध रासायनिक उत्पादने निर्माण करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. मात्र याकडे जबाबदार अधिकारी मुद्दाम कानाडोळा करीत असल्याचे समोर येत आहे. रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडले जातेय, हे स्वत:च्या डोळ्याने बघूनदेखील त्यावर काहीच कारवाही केली जात नाही.
गेल्या महिन्यात कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या पाच कंपन्यांचे वीज कनेक्शन व पाणीपुरवठा बंद केला होता. यामध्ये या पाचही कंपन्यांचे पाणी व वीज बंद करण्याचे आदेश होते. जनमताच्या रेट्याने महावितरण अधिकाऱ्यांनी कारवाही केली खरी, मात्र अगदी एका दिवसाच्या आत मेल्झर केमिकल्सचे वीज व पाणी पुन्हा चालू झाले. फक्त पाच लाख रुपयांच्या जामिनावर त्यांना कंपनी पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, सांडपाणी उघड्यावर सोडले जाणार नाही या अटीवर. तरीदेखील या सांडपाणी परत सोडले जात आहे.
मेलझर केमिकल्स या कंपनीचा रस्त्यावरच रसायनांचा साठा ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान या सर्व प्रकारात येथील अधिकारी वर्गाशी संपर्क केला असता त्यांनी कंपनीच्या खालील पाणी हे वर्षापूर्वी केलेल्या बांधकामावर मारलेले पाणी असल्याचे धक्कादायक वक्तव्य केले.
रस्त्यावरील रसायनाच्या साठ्याचे चित्रीकरण करताना अचानक सर्व यंत्रणा हे रसायन आत उचलून ठेवण्याचे काम सुरू झाले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही.