औद्योगिक वीजपुरवठ्यातून कुरकुंभला वगळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 02:42 PM2019-12-14T14:42:27+5:302019-12-14T14:50:38+5:30
कुरकुंभ परिसरात प्रदूषणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात नवीन विद्युत पुरवठ्यात औद्योगिक क्षेत्राला देखील जोडण्याची मागणी
कुरकुंभ : येथे नव्याने विद्युतपुरवठा करणारी वीजवाहिनी टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे कुरकुंभ व परिसराला मिळणारी औद्योगिक क्षेत्रातील विद्युतपुरवठा करणारी सुविधा बंद पडून भारनियमनाचे चक्र सुरू होणार असल्याने कुरकुंभ ग्रामपंचायतने यावर आक्षेप घेत नव्याने टाकण्यात येणाऱ्या विद्युतवाहिनीला विरोध केला आहे.
कुरकुंभ परिसरात औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या वीज व पाणीपुरवठ्याच्या सुविधांवर गदा आणण्याचे काम होत असून, त्यामुळे येणाऱ्या काळात कुरकुंभवर परिणाम होणार असून, याचा पुनर्विचार करण्याचे निवेदन ग्रामस्थांनी दिले आहे.
कुरकुंभ परिसरात गेल्या ३० वर्षांपासून औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून रासायनिक प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या समस्येला येथील ग्रामस्थ सुरुवातीच्या काळापासून तोंड देत आले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून येथील ग्रामस्थांना सुविधा मिळाव्या, या हेतूने तत्कालीन आमदार सुभाष कुल यांच्या माध्यमातून कुरकुंभ व पांढरेवाडी या प्रकल्पग्रस्त गावांना वीज व पाणीपुरवठा औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून करण्याच्या हेतूने प्रयत्न झाले. त्यामुळे परिसरातील विजेचा व पाण्याचा प्रश्न सुटला होता. कुरकुंभ परिसरात औद्योगिक क्षेत्रावर आधारित अनेक उद्योग व्यवसाय उभे राहिले. मात्र, सध्या औद्योगिक क्षेत्रापासून वेगळी नवीन विद्युतपुरवठा करणारी वीजवाहिनी गावात टाकण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी या नव्या वीजवाहिनीला विरोध केला आहे.
कुरकुंभ परिसरात प्रदूषणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात डोके वर काढत आहेत. अशा परिस्थितीत गावाला मिळणाऱ्या सुविधादेखील बंद होणार काय? असा प्रश्न ग्रामस्थांना भेडसावत आहे. परिसरातील दहा किलोमीटरपर्यंत दूषित झालेले जमिनीतील पाण्याच्या स्रोताने गावातील हजारो नागरिकांना औद्योगिक क्षेत्राच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने असलेला वीजपुरवठा बाधित होणार या भीतीने कुरकुंभ येथील सर्वसामान्य व्यावसायिक चिंतित झाले आहेत.
अनेक छोटे व्यवसाय या परिसरात असून, वीजपुरवठा खंडित होत नसल्याने याला उभारी मिळत असताना होणारा निर्णय हा लागू होऊ नये यासाठी मागणी केली जात आहे.
........
कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्राच्या वाढत्या प्रदूषणाच्या समस्येने हजारो नागरिक ग्रासले असताना या परिसरात निर्माण होणाऱ्या छोट्या व्यावसायिक वृद्धीने व औद्योगिक क्षेत्रापासून मिळणाऱ्या वीज व पाणीपुरवठ्याच्या सुविधेने थोडेफार आश्वस्त होत आहोत. अशातच वीजपुरवठा वेगळा करून कुरकुंभवर अन्याय होईल, अशा पद्धतीने वीजवाहिनी टाकू नये. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये औद्योगिक क्षेत्राबद्दल असणारी नाराजी आणखी तीव्र होऊ शकते.-राहुल भोसले, सरपंच, कुरकुंभ
........
सध्या कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या विद्युत मागणीला पर्याय म्हणून व भविष्यात कुरकुंभसाठी अतिरिक्त वीजपुरवठा करण्यासाठी नवीन वीजवाहिनी टाकली जात आहे. यामधून कुठलेही भारनियमन कुरकुंभला येणार नसून औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातूनच अविरत वीजप्रवाह सुरूच राहणार आहे.- मिलिंद डोंबाळे, उपकार्यकारी अभियंता, उपविभाग दौंड.
...........
कुरकुंभ येथील सरपंच राहुल भोसले यांनी कुरकुंभ येथील वीजपुरवठा औद्योगिक क्षेत्रापासून विभक्त करू नये यासाठी लेखी निवेदन उपकार्यकारी अभियंता मिलिंद डोंबाळे यांना दिले आहे. औद्योगिक क्षेत्रामधून वगळण्यात आल्यावर भारनियमनाचा त्रास परिसरातील व्यावसायिकांना होणार नसल्याची खात्री करूनच नवीन विद्युतपुरवठा वाहिनी सुरु करण्यात यावी याबाबत निवेदनात मागणी करण्यात आली आहे. मात्र, असा कुठलाही प्रकार होणार नसल्याचे डोंबाळे यांनी सांगितले आहे.