कुरवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:11 AM2021-09-26T04:11:02+5:302021-09-26T04:11:02+5:30
निकृष्ट काम पुन्हा नव्याने करून नागरिकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न सणसर: इंदापूर तालुक्यातील सणसर-कुरवली हा रस्ता तसा निकृष्ट कामामुळे ...
निकृष्ट काम पुन्हा नव्याने करून नागरिकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न
सणसर: इंदापूर तालुक्यातील सणसर-कुरवली हा रस्ता तसा निकृष्ट कामामुळे गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी निकृष्ट काम पुन्हा नव्याने सुरू करण्यात आले. गावठाणातील काम अपूर्ण आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला मुहूर्त मिळत नसल्याची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे.
सणसर (ता. इंदापूर) येथे सणसर ते कुरवली हा रस्ता सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावरून अनेक नागरिकांना दैनंदिन कामासाठी प्रवास करावा लागतो. पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्हा, तसेच सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी या मध्यम मार्गाचा नागरिक मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. मात्र, सध्या सणसर बस स्थानक ते छत्रपती हायस्कूल सणसर या टप्प्यातला अंदाजे सातशे मीटर रस्ता तयार करण्याचे बाकी आहे.
गेल्या एक वर्षापासून या रस्त्याचे काम चालू आहे. मात्र, इतर कामे ठेकेदाराने उरकली. मात्र, गावठाणातील रस्ता मागे ठेवण्यात आल्याची तक्रार नागरिक करत आहेत. या रस्त्यावरून मोठी रहदारी असतानाही जाणीवपूर्वक या रस्त्याचे काम रखडविण्यात आले आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून सध्या पावसाचे दिवस असून खड्ड्यात पाणी साचले आहे. मात्र, नागरिकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघातही वाढले आहेत. या रस्त्यावर एखादा अपघात झाल्यावर त्यास जबाबदार कोण? किरकोळ कारणावरून या रस्त्याचा विलंब नागरिकांना त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे या रस्त्याच्या ठेकेदाराचे करायचे काय, असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत.
गावठाणातून जाणारा हा रस्ता असल्याने नागरिकांची, तसेच गावकऱ्यांचीही फार अडचण होत आहे. हा रस्ता तयार करत असताना जुन्या नकाशाप्रमाणे काम करावे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे अतिक्रमण समान पद्धतीने काढावे. कोणावरही अन्याय होऊ नये. हा रस्ता लवकरात लवकर करावा, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्व जबाबदारी ही संबंधित ठेकेदारावर असेल, असा इशारा पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष नितीन निंबाळकर यांनी दिला आहे.
सणसर-कुरवली या रस्त्याचे अपूर्ण असलेले काम.
२५०९२०२१ बारामती—०३