फर्ग्युसन रस्त्यावरील L ३ बारचा परवाना रद्द; आतापर्यंत ६९ पबचे परवाने रद्द करून केले सीलबंद
By नम्रता फडणीस | Published: June 25, 2024 04:46 PM2024-06-25T16:46:46+5:302024-06-25T16:47:08+5:30
उत्पादन शुल्क आतापर्यंत १८८ ठिकाणी कारवाया करण्यात आल्या असून, शहरातील ६९ बारचे परवाने तत्काळ रद्द करून बार सीलबंद
पुणे: फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड, लिजर, लाऊंज (एल ३ ) बारमधील अमली पदार्थ सेवन आणि अवैध मद्य विक्रीच्या प्रकरणाचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार वर छापा टाकला आणि यात सहा जणांना अटक करण्यात आल्यानंतर आता विभागाने (एल ३) बारचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, विभागाकडून दि. १ एप्रिलपासून आत्तापर्यंत १८८ ठिकाणी कारवाया करण्यात आल्या असून, शहरातील ६९ बारचे परवाने तत्काळ रद्द करून बार सीलबंद करण्यात आले आहेत.
एल ३ बारमध्ये रात्री दीड नंतर अवैध पार्टी झाली. त्यात पब चालविणा-यांनी बेकायदेशीरपणे केलेला मद्याचा साठा, अमली पदार्थांचे सेवन, अल्पवयीन मुलांचा सहभाग या सर्व गोष्टी समोर आल्या. समाज माध्यमावर एल थ्री बारमधील पार्टी आणि प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आणि पुणेपोलिसांनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानेही एल ३ पबवर कारवाईचा बडगा उगारला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानेही रविवारी सायंकाळी एल थ्री बारमध्ये छापा टाकून सव्वातीन लाख रुपयांचा बेकायदा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने सहा कर्मचाऱ्यांना (वेटर) अटक केली.
फर्ग्युसन रस्त्यावरील इमारतीतील तळमजला आणि पहिल्या मजल्यावर संतोष कामठे यांच्या नावाने हाॅटेल रेनबोला मद्य विक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. सध्या रेनबो हाॅटेलचे नाव बदलण्यात आले असून, एल थ्री बार नावाने तेथे व्यवसाय सुरु आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी छुपा मार्ग काढून मंजूर नकाशात बदल करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाहणी केली. तेव्हा परवाना कक्षात गंभीर स्वरुपाचे फेरबदल करण्यात आले आहे. परवाना कक्षात अंतर्गत बदल करण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने परवाना तत्काळ रद्द करुन बार सीलबंद करण्यात आला आहे.
फर्ग्युसन रस्त्यावरील एल ३ बारचे नाव पूर्वी होते 'रेनबोला' फर्ग्युसन रस्त्यावरील एका इमारतमधील तळमजला आणि पहिल्या मजल्यावर संतोष कामठे यांच्या मालकीचे रेनबोला नावाचे हॉटेल होते. या हॉटेलसाठी रेनबोला मद्य विक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला. या हाॅटेलचे नाव बदलून सध्या एल ३ बार नावाने तेथे व्यवसाय सुरु आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी छुपा मार्ग काढून मंजूर नकाशात बदल करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाहणी केली. तेव्हा परवाना कक्षात गंभीर स्वरुपाचे फेरबदल करण्यात आले आहे. परवाना कंक्षात अंतर्गत बदल करण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने परवान्याचे तत्काळ निलंबन करून बार सीलबंद करण्यात आले आहेत. यापुढील काळात ज्या बारच्या परवान्यामध्ये अनियमितता आढळेल त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे कार्यालायचे अधीक्षक चरणसिंह रजपूत यांनी दिली.