कामगार नेते बगाराम तुळपुळे यांचे निधन
By admin | Published: April 16, 2015 12:57 AM2015-04-16T00:57:07+5:302015-04-16T00:57:07+5:30
स्वातंत्र्यसेनानी आणि ज्येष्ठ समाजवादी, कामगार नेते बगाराम तुळपुळे यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
पुणे : स्वातंत्र्यसेनानी आणि ज्येष्ठ समाजवादी, कामगार नेते बगाराम तुळपुळे यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्यामागे त्यांची पत्नी प्रभा तुळपुळे, मुलगा हिमांशू आणि मुलगी इंदवी तुळपुळे असा परिवार आहे.
तुळपुळे यांच्यावर मंगळवारी रात्री कोणतेही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले. तुळपुळे हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ‘चले जाव’ आंदोलनापासून अलीकडच्या काळातील सर्वच आंदोलनांमध्ये सक्रिय सहभागी होते. वीज कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक वर्षे काम केले. कामगारांच्या प्रश्नांसाठी आंदोलने, सभा, मोर्चे काढत असतानाच त्यांनी कामगारांना प्रशिक्षण देण्याचे काम केले. कामगार चळवळीमध्ये बुद्धिवंत, क्रियाशील कामगार नेते अशी त्यांची ओळख होती. समाजवादी विचारांवर निष्ठा ठेवून तो विचार समाजात पोहोचविण्यासाठी तुळपुळे यांनी काम केले. जागतिकीकरण आणि जमातवादाला प्रखर विरोध करत असतानाच व्यापक समाजपरिवर्तनाचे त्यांनी स्वप्न पाहिले. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले.
सोशालिस्ट पाटीर्चे ते मार्गदर्शक होते. वीज कामगार आणि त्यांची युनियन करून प्रश्न सोडविण्याचे त्यांनी काम केले. बुद्धिवंत कामगार नेता म्हणून ते कामगार चळवळीत ओळखले जात असत. (प्रतिनिधी)
तुळपुळे यांच्या निधनामुळे कामगार चळवळीची मोठी हानी झाली आहे. इंजिनिअरिंग व्यवसायातील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी तुळपुळे यांनी काम केले आहे.
- भाई वैद्य,
ज्येष्ठ समाजवादी नेते
कामगारांचे प्रश्न सोडवत असतानाच कामगारांना प्रशिक्षण आणि वैचारिक मार्गदर्शन करण्याचे काम तुळपुळे यांनी केले. कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या आजच्या पिढीला त्यांनी सातत्याने मार्गदर्शन करण्याचे काम केले.
- डॉ. बाबा आढाव,
कामगार नेते
समाजवादी विचारांमध्ये कालसुसंगत बदल करण्याची क्षमता तुळपुळे यांच्यामध्ये होती. त्यांना कार्यकर्त्यांबरोबर प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि जनतेशी संवाद असल्यामुळे त्यांच्यामध्ये ताजेपणा असायचा. त्यांच्या निधनामुळे समाजवादी चळवळीची मोठी हानी झाली आहे.
-प्रा. सुभाष वारे,
सामाजिक कार्यकर्ते