कामगार नेते नाना क्षीरसागर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:08 AM2017-08-01T04:08:09+5:302017-08-01T04:08:09+5:30
ज्येष्ठ कामगार नेते नाना क्षीरसागर (वय ६२) यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
पुणे : ज्येष्ठ कामगार नेते नाना क्षीरसागर (वय ६२) यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांनी महाराष्ट्र कामगार सेना, महाराष्ट्र रिक्षा सेना, महाराष्ट्र हमाल सेना, हातगाडी पथारी संघटना, महाराष्ट्र टेम्पो सेना अशा अनेक संघटनांच्या माध्यमातून असंघटित कामगारांसाठी काम उभे केले होते. नाना यांचे पूर्ण नाव किशोर माधव क्षीरसागर असे होते. ते गुरुवार पेठेतील फुलवाला चौकामध्ये राहत होते. नानांनी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार निर्मूलन संस्थेचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले होते. यासोबतच डॉ. बाबा आढाव यांच्या बांधकाम कामगार पंचायतीचेही काही काळ काम केले होते. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र संघटना सुरु केल्या.
विविध असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या संघटना त्यांनी सुरु केल्या. त्यांच्यावर सोमवारी संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.