कामगार संघटनेला नवी दिशा देणारा शरद राव यांच्यासारखा कामगार नेता आता होणे नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 02:05 AM2018-09-02T02:05:53+5:302018-09-02T02:06:28+5:30
जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबर काम करताना स्वत:च्या नोकरीचा त्याग करून ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांनी कामगारांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन केले.
तळेगाव दाभाडे (जि. पुणे) : जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबर काम करताना स्वत:च्या नोकरीचा त्याग करून ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांनी कामगारांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन केले. आयुष्यभर संघर्षमय जीवन जगत त्यांनी १८ लाख कामगारांचे नेतृत्व करून कामगार संघटनेला एक नवी दिशा दिली. राव यांच्या सारखा कामगार नेता होणे नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
राममनोहर लोहिया समाजवादी विद्यापीठाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कामगार नेते शरद राव यांच्या पंचधातूच्या अर्धाकृ ती पुतळ्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय उपध्यक्ष अॅड. महाबळ शेट्टी होते. या वेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष अॅड. सुखदेव काशीद, उपाध्यक्ष रमेश मालविय, कार्याध्यक्ष वामन कविस्कर, माजी राज्यमंत्री मदन बाफना, यांच्यासह आमदार, कामगार चळवळीतील नेते उपस्थित होते.
पवार म्हणाले, सध्या कामगार संघटनेमध्ये सक्षम नेतृत्वाअभावी कामगारांचे प्रश्न मागील दोन वर्षांपासून रखडले आहेत. कामगार संघटनांनी कामगार व नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणे व विधायक कार्य करणे गरजेचे आहे. जार्ज फर्नांडिस व शरद राव हे कामगारांच्या न्याय हक्कासाठी संप कधी करायचा, कधी मागे घ्यायचा यात परिपक्व होते. मागण्या पदरात कशा पाडून घ्यायच्या याचे तंत्र त्यांना अवगत होते.
लोहियांचा
खरा वारसदार
दलित, पीडित, शोषित, कामकरी, कष्टकरी, जनतेची बाजू प्रभावीपणे मांडून त्यांच्या हितासाठी आयुष्यभर संघर्षाअधीन राहिलेले समाजवादी विचारवंत डॉ. लोहिया यांचा खरा वारसा कामगार नेते राव यांनी जतन केला, असेही पवार म्हणाले.