हडपसर भागात भिंत कोसळून मजुराचा मृत्यू; अभियंत्यासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा
By नितीश गोवंडे | Published: May 3, 2024 04:48 PM2024-05-03T16:48:17+5:302024-05-03T16:49:01+5:30
या दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी अभियंत्यासह बांधकाम ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
पुणे :हडपसर भागातील एसपी इन्फोसिटीच्या आवारातील एका कार्यालयात प्रसाधनगृहातील भिंत कोसळून बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. या दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी अभियंत्यासह बांधकाम ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्राम बालाजी पांडे (३१, रा. खुपटवाडी, उंड्री चौक) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी अभियंता साहिल निसार कारभारी (२९, रा. गुलमोहोर होरायजन, कोंढवा) आणि ठेकेदार माधव गोविंदराव माने (रा. पारगेनगर, कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत किसन तुकाराम माने (३७, रा. पारगेनगर, कोंढवा) यांनी हडपसरपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात एसपी इन्फोसिटी माहिती-तंत्रज्ञान कंपनी आहे. या कंपनीच्या आवारात एका नवीन कार्यालयाचे काम करण्यात येत होते. प्रसाधन गृहाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना अचानक भिंत बांधकाम मजूर संग्राम पांडे याच्या अंगावर कोसळली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या संग्रामचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रसाधनगृहाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना आवश्यक ती खबरदारी न घेता सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने दुर्घटना घडल्याचे तक्रारदार किसन माने यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करत आहेत.