बाणेर भागात मजुराच्या डोक्यात दगड घालून खून: एक संशयित ताब्यात
By नम्रता फडणीस | Published: June 10, 2024 06:03 PM2024-06-10T18:03:48+5:302024-06-10T18:04:27+5:30
अनैतिक संबंधाच्या संशयातून तर नाना याचा खून झाला नाही ना,या अनुषंगाने देखील पोलिसांचा तपास सुरू
पुणे : मजुराच्या डोक्यात दगड घालून, तोंडाला रुमाल बांधून त्याचा खून करण्यात आला. ही घटना धनकुडे वस्ती बाणेर भागात घडली. खुनामागचे कारण समजले नसून,चतु: श्रुंगी पोलिसांनी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. नाना विठ्ठल चादर (वय 36, रा. वाकड, मुळ. नाळवंडी रोड बीड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत नाना याचा भाऊ सचिन चादर (वय 34) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 7 ते 9 जून या कालावधीत रामदास धनकुडे यांच्या मोकळ्या जागेत धनकुडे वस्ती परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नाना मजुरी करतो. पंधरा दिवसापूर्वी नाना त्याच्या बालेवाडी येथील मित्राकडे राहण्यास आला होता. दोन दिवसांपूर्वी तो बेपत्ता झाला होता. पत्नी त्याला फोन करत होती. मात्र फोन बंद होता. तिने सासूला फोन करून नाना याचा फोन बंद असल्याची माहिती दिली. नानाच्या आईने हा प्रकार फिर्यादी मुलगा सचिन याला सांगितले. सचिन याने त्याचा सुस येथील मित्राला नाना कोठे दिसला तर कळविण्यास सांगितले होते. त्यावेळी मित्राने सांगितले की, नाना हा नेहमी धनकुडे वस्तीवर दारु पित बसलेला असतो, तो तेथे बेशुद्ध अवस्थेत मिळून आला आहे. फिर्यादींनी धनकुडे वस्तीवर जाऊन पाहिले असता, नाना त्यांना बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. नाना याचे तोंड रक्ताने माखलेले होते. त्याच्या तोंडावर रुमाल बांधलेला होता. तसेच डोक्यात कठीण वस्तूने मारल्यामुळे गंभीर जखम झालेली होती. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर नाना याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. नाना याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, नाना चादर याची एका महिलेशी मैत्री होती. मात्र त्या महिलेच्या पतीला हा प्रकार आवडत नव्हता. अनैतिक संबंधाच्या संशयातून तर नाना याचा खून झाला नाही ना,या अनुषंगाने देखील पोलिसांचा तपास सुरू आहे.
मृताच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही, यामध्ये एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तपास सुरू आहे-अजय कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुःश्रृंगी