लालेलाल टोमॅटो एक रुपया किलो
By Admin | Published: January 4, 2017 05:16 AM2017-01-04T05:16:38+5:302017-01-04T05:16:38+5:30
३० किलो टोमॅटोचे कॅरेट अवघ्या २५ ते ३० रुपयांना टोमॅटो ज्यूससाठी उत्तर प्रदेशमधील टोमॅटो खरेदी करणाऱ्या भय्यांना पुरंदर तालुक्यातील शेतकरी विकत आहेत.
गराडे : ३० किलो टोमॅटोचे कॅरेट अवघ्या २५ ते ३० रुपयांना टोमॅटो ज्यूससाठी उत्तर प्रदेशमधील टोमॅटो खरेदी करणाऱ्या भय्यांना पुरंदर तालुक्यातील शेतकरी विकत आहेत. म्हणजे १ किलो टोमॅटो अवघ्या १ रुपया किमतीने विकला जातोय. मार्केटला टोमॅटो पाठवायचा म्हटले तर २५ रुपये भाडे द्यावे लागते.
तोडणी, उत्पादन खर्चही निघत नाही. यंदा टोमॅटो पिकांच्या घसरलेल्या बाजारभावामुळे पुरंदर तालुक्यातील टोमॅटो शेतीव्यावसायिक आर्थिक संकटात सापडला आहे. लालेलाल झालेले टोमॅटोचे फड शेतकऱ्यांनी तोड्याविना तसेच सोडून दिले आहेत. काही शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या फडात गुरे सोडून दिली आहेत.
पुरंदर तालुक्यात टोमॅटोची पिके चांगली आली आहेत. टोमॅटो पिकाची शेतकऱ्यांनी केलेली काळजीपूर्वक देखभाल, स्वच्छ हवामान यामुळे टोमॅटो पिकाचे प्रचंड उत्पादन झाले आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे ढासळलेले शेतमालाचे बाजारभाव अद्यापही ‘जैसे थे’ आहेत. नोटाबंदीचा थेट फटका टोमॅटो उत्पादकांनाही बसला आहे. आवक वाढल्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
पुरंदर तालुक्याला खेटून लगतच पुणे शहराची मोठी बाजारपेठ असलेने टोमॅटोची चांगली विक्री होऊन नफा मिळतो. टोमॅटोच्या पिकामुळे शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळतो. जास्त पावसामुळे टोमॅटो खराब होतात. परंतु यंदा पुरंदर तालुक्यात खूपच कमी पाऊस पडला. त्यामुळे टोमॅटोचे फड चांगले येऊन टोमॅटो खराब झाले नाहीत.
विक्रमी उत्पादन होऊन जास्त आवक वाढल्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव घसरले तसेच नोटाबंदीच्या निर्णयामुळे टोमॅटो पिकाचे बाजारभाव कोसळलेले आहेत. याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसल्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला आहे.
टोमॅटो उत्पादक शेतकरी भाऊसाहेब शेंडकर व मनोज शेंडकर म्हणाले, दरवर्षी टोमॅटोचे चांगले पैसे मिळतात. त्यामुळे प्रपंचाला हातभार लागतो. परंतु यंदा मात्र टोमॅटोची पिके खूप चांगली येऊनदेखील बाजारभाव कोसळल्यामुळे उत्पादन खर्चही निघला नाही. सगळा तोटाच झाला आहे. आम्ही ३० किलो टोमॅटोचे कॅरेट २५ ते ३० रुपयाला भय्यांना विकत आहाते.
२० गुंठ्यात टोमॅटोचा फड चांगल्यारीतीने आणण्यासाठी ४५ हजार रुपये खर्च झाला. आतापर्यंत टोमॅटो ५५०० रुपये हातात पडले आहेत. आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांची हीच तऱ्हा आहे.
खूपच वंगाळ दिवस शेतकऱ्यांवर आले आहेत. (वार्ताहर)